

उल्हासनगर : मित्राचे अपहरण करून जबरदस्तीने ऑनलाईन खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना म्हारळ गावातील डंपिंग खदान परिसरात गुरूवारी (दि.१६) उघडकीस आली. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलास कॉलनी येथे राहणारे अजय आहुजा यांच्याशी नरेश छाब्रिया यांची मैत्री झाली होती. या मैत्रीचा फायदा घेत नरेश छाब्रिया याने 'मुलगी आजारी आहे, पैशाची गरज आहे' असे सांगून त्यांना एका ठिकाणी बोलविले. त्यानंतर अजय आहुजा यांच्या गाडीवर बसून माझ्या घरी जाऊया म्हणत काही अंतरावर नेले व अजय यांच्या पाठीला चाकू लावून त्यांना म्हारळ गावातील डंपिंग खदान परिसरातील एका खोलीत घेऊन गेला. तेथे नरेश याचे तीन साथीदार होते. चौघांनी अजय यांना बेदम मारहाण करून चाकूचा धाक दाखवून दोरीने बांधून घातले. तसेच त्यांच्या मित्राकडून जबरदस्तीने ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून २ लाख ९८ हजार ५०० रुपये मागविण्यास भाग पाडले. नातेवाईकांनी नरेश याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत सीसीटिव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे म्हारळ गावातील डंपिंग खदान परिसरातून अजय यांची सुटका करत नरेश याला अटक केली. त्याचे तीन साथीदार पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात नरेश छाब्रिया आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी व पोलिस हवालदार मंगेश जाधव, अमर कदम, बाबूलाल जाधव, संजय शेरमाळे, नितीन बैसाने आणि अविनाश पवार यांच्या पथकाने केली. नरेश छाब्रिया यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्याच्यावर यापूर्वीही पाच ते सहा जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.