चिपळूण : समीर जाधव
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाट रस्ता महत्त्वाचा आहे. पावसाळ्यातील सुरक्षितता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने उपाययोजनेचे नियोजन केले खरे; पण यावर्षी पाऊस उशिरा सुरू होऊनदेखील अद्याप ही कामे अपूर्णच आहेत. निविदा काढण्यात येऊनही या निविदेतील कामे पूर्ण झालेली नाहीत. काही टप्प्यातील खड्ड्यांचे डांबरीकरण व काँक्रीटने भरण्याचे काम झाले. मात्र, अनेक कामे निविदेनुसार शिल्लक आहेत. त्यामुळे या पावसाळ्यातही वाहनधारकांना धोका पत्करून प्रवास करावा लागेल.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा कुंभार्ली घाट हा महत्त्वाचा दुवा आहे. मंडणगड, खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर या भागातील लोक, तसेच एसटी सेवा, अवजड वाहतूक कुंभार्ली घाटातून होत असते. दरवर्षी पावसाळ्यात कुंभार्ली घाट चर्चेत येतो. अतिवृष्टीमध्ये दरडी कोसळून किंवा रस्त्याला खड्डे पडून या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनते. परंतु हा घाट पावसामध्ये हिरवळीने सजतो.
ठिकठिकाणी डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे, दाट धुके, गारवा यामुळे पावसाळ्यामध्ये कुंभार्ली घाटातून विहंगम दृष्य पाहायला मिळते. परंतु येथील वाहतूक अनेकवेळा धोकादायक ठरते. कुंभार्ली घाट हा एकमेव असा घाट आहे की तो बारमाही दिवस-रात्र वाहतुकीसाठी सुरू असतो.
गतवर्षी परशुराम, रघुवीर घाट, आंबा घाट तसेच सिंधुदुर्गातील काही घाट बंद असताना देखील कुंभार्ली घाट एकमेव वाहतुकीसाठी दिवस-रात्र सुरू होता. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने कुंभार्ली घाटाचे महत्त्व अत्यंत मोलाचे आहे. रत्नागिरीतील अवजड वाहतूक देखील या घाटमार्गे सुरू असते. त्यामुळे एमआयडीसीच्या दृष्टीने हा घाट महत्त्वाचा आहे.
नऊ कोटींचा निधी खर्ची पडेल?
सुमारे २१ कि.मी. लांबीचा हा घाट पोफळी येथून सुरू होतो. पावसाळ्याच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुंभार्ली घाटातील अवघड वळणावर पडलेले खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी डांबरीकरणाने खड्डे बुजविले, तर काही ठिकाणी खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजविण्यात आले. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात हे काम पाऊस संपेपर्यंत टिकेल का? हा दरवर्षीचाच सवाल आहे. मात्र, अजूनही हे काम अपूर्ण असून, आता राष्ट्रीय महामार्ग विभाग पावसाने उघडीप दिल्यावर उर्वरित खड्डे काँक्रीटने भरू, असे सांगत आहे. त्यामुळे या डागडुजीसाठी नऊ कोटींची निविदा पूर्ण खर्ची पडेल की नाही? या बाबत साशंकता व्यक्त होत आहे.
घाटात बोगदा करून द्रुतगती मार्गासाठी पुनःसर्वेक्षण
कुंभार्ली घाटातून जयगड-चिपळूण-सातारा असा नवा द्रुतगती रस्त्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असून, कुंभार्ली घाटातून बोगदा काढून थेट कोयनेला जोडण्याचा प्रस्तावदेखील आहे. त्या दृष्टीने पुढच्या टप्प्यात पुनःसर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे कुंभार्ली घाटातून बोगदा झाल्यास धोकादायक घाट रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
पावसाळ्यानंतर २० कोटींची कामे होणार
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटाच्या डांबरीकरणासाठी प्रस्ताव आहे. त्यासाठी सुमारे २० कोटींचा निधी मंजूर देखील झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर हे डांबरीकरण पूर्ण होणार आहे. पिंपळी ते घाटमाथा दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. हे डांबरीकरण पावसाळ्यानंतर होणार असल्याने पावसाळ्यातील डागडुजीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सवाल उपस्थित होत आहेत.