konkan railway  file photo
रत्नागिरी

Konkan Railway Ganeshotsav Special Trains | गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांकडे चाकरमान्यांचे डोळे

Konkan Railway Ganeshotsav Special Trains- गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांकडे चाकरमान्यांचे डोळे

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन सुरू असताना आता चाकरमान्यांचे लक्ष कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांकडे लागले आहे. मात्र, १० ऑगस्टपर्यंत कोकण रेल्वेकडून गणेशोत्सव २०२६ साठी विशेष गाड्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. मुंबई, ठाणे, पुणे परिसरातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण काही वेळातच फुलते. त्यामुळे दरवर्षी कोकण रेल्वेकडून अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याबरोबरच काही नियमित गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जातात.

कोकण रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये गणपती उत्सवासाठी तब्बल ३८१ विशेष गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी २०२४-२५ मध्ये ३०४ विशेष गाड्या धावल्या होत्या. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने विशेष गाड्या जाहीर होण्याची अपेक्षा चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर रोड, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर गणेशोत्सव काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. विशेष गाड्यांची घोषणा झाल्यानंतर त्यांचे वेळापत्रक, फेऱ्या आणि आरक्षणाची माहिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, कोकण रेल्वेने यंदाच्या उन्हाळी हंगामात अतिरिक्त विशेष गाड्या चालविल्या होत्या. या गाड्यांना रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर रोड, राजापूर रोड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले होते. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्यांच्या घोषणेची प्रतीक्षा असून, कोकण रेल्वेने लवकरात लवकर विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT