गुहागर शहर : पुढारी वृत्तसेवा
कोकणातील प्रमुख नगदी पीक असलेल्या काजूच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने रत्नागिरीसह कोकण पट्टयातील बागायतदार गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, राजापूर आदी भागांमध्ये काजू उत्पादनावर निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या बाजारात काजूला १६० ते १७० रुपये प्रति किलो असा समाधानकारक दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा माल नसल्याने या वाढीव दराचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. परिणामी चांगल्या दराची संधी असूनही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
हवामानातील बदलामुळे काजू बागांमध्ये कीड व विविध रोगांचा प्रादुर्भावही वाढला. यामुळे तयार होणाऱ्या फळांची संख्या कमी झाली आणि गुणवत्तेवरही परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी खर्च केला असला तरी अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
काजू बागायतदारांनी खत, औषधे, मजुरी आदींसाठी केलेला खर्च मोठा आहे. मात्र उत्पादन घटल्याने हा खर्चही निघणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांना तर तोट्याचा सामना करावा लागत आहे. दर चांगले असूनही उत्पादन नसल्याने उत्पन्नात घट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे बाजारात काजूची मागणी कायम असताना उत्पादन घटल्यामुळे व्यापाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बाजारात मालाचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत; मात्र पुरवठा कमी असल्याने व्यवहारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढालही अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमितता हे उत्पादन घटण्यामागील मुख्य कारण ठरले आहे.
पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा लांबल्याने काजूच्या झाडांना वेळेवर विश्रांती मिळाली नाही. त्यानंतर मोहराच्या टप्प्यावर आलेले दाट धुके आणि बदलते तापमान यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली. त्यामुळे फळधारणेवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याचे दिसत आहे.