लांजा: अगदी लहान वयापासून ते वयाची 40 वर्षे कोकणची नमन लोककला जोपासणाऱ्या लांजा तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथील राजाराम देऊ मांडवकर यांचे तालुक्यामधून कौतुक होत आहे. विनोदी ते विविध भूमिका ते उत्तम प्रकारे साकारत आहेत.
एकीकडे नमन कलेला राजश्रय मिळावा यासाठी कोकणातील अनेक नमन मंडळे व त्यांचे पदाधिकारी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासकीय यंत्रनेकडून नमन कलेला न्याय मिळेल या आशेवर राहून नमनकला अधिक समृद्ध करण्याचे काम नमन कलावंत करत आहेत. अत्यंत लोकप्रभावी असणारी ही कला कोकणातील सार्वजनिक उत्सव, घर कार्यक्रम, यात्रा यामध्ये खेडोपाडी लक्ष वेधून घेत आहे. नमन कलेच्या माध्यमातून अनेक कलावंत घडत आहेत. राजाराम मांडवकर विविध कार्यक्रमांत त्यांचा सन्मानही झाला आहे.
मांडवकर नमन कलेतील विनोदी पात्र असणारे पेंद्या-सुदाम, यासह गणात असणारे विविध भूमिका त्यांनी केल्या असून ते आजही करत आहेत. श्री देव शंकर, राजा ज्योतिबा तर वगनाट्यमध्ये शिपाई, काळू-बाळू अशा विनोदी व गंभीर असणाऱ्या भूमिका राजाराम मांडवकर हे साकारत आहेत. त्यांच्या नमन कलेतील अभिनयाला लांजा तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकवेळा ते विविध कार्यक्रमांमधून सन्मानित झाले आहेत.