खेड : तालुक्यातील ऐनवली गावातील एका वीटभट्टीवर अल्पवयीन विवाहित जोडपी बालकामगार म्हणून काम करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बुधवार, दि. 7 रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे.
या दोन्ही जोडप्यांपैकी दोन्ही अल्पवयीन मुलींना बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ खेड पोलिसांना माहिती दिली असून पोलिस या घटनेची कसून चौकशी करीत आहेत.यासंदर्भात माहिती मिळताच खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात धाव घेतली व प्राथमिक चौकशी करून पुढील तपासाला सुरुवात केली. त्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलींना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खेड पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही दोन अल्पवयीन विवाहित जोडपी तालुक्यातील ऐनवली गावातील एका वीटभट्टीवर काम करत होते. या घटनेनंतर तेथील वीटभट्टीवर इतर अल्पवयीन मुले किंवा मुली काम करत आहेत का, याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात बालकामगार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई होण्याची शक्यता असून, खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.