

वाशिम: कामगार उपआयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या निर्देशानुसार आणि सरकारी कामगार अधिकारी, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत एका आस्थापनावर छापा टाकून किशोरवयीन कामगाराची मुक्तता करण्यात आली आणि संबंधित मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
ही मोहीम (प्र) दुकाने निरीक्षक योगेश गोटे, श्रीमती चैताली खोंड यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच बबन सुर्वे (विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम), डॉ. अनिल रुईकर (मेडिकल ऑफिसर, आरोग्य विभाग), अमोल देशपांडे (जिल्हा महिला व बालविकास कार्यालय), सत्यप्रकाश सुपारे (पो.हे.कॉ.), सुनंदा गाडे (पो.हे.कॉ., वाशिम पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने संयुक्तपणे कार्यवाही केली. कारवाईदरम्यान, एक किशोरवयीन कामगार मुक्त करण्यात आला, तर धरमजित सिंग हुशार सिंग या आस्थापनेच्या मालकाविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
बाल व किशोरवयीन कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1986 व सुधारित अधिनियम 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही प्रकारच्या मजुरीसाठी ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक ठिकाणी मुलांना मजुरीसाठी काम करायला लावले जाते. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बालमजुरी विरोधात समाजानेही पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी कळवाव्यात, असे आवाहन संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.