खेड : खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरंभापासूनच रंगलेल्या राजकीय रणसंग्रामात आज नामनिर्देशनाचा अंतिम दिवस गजबजून गेला. दिवसभरात मोठ्या संख्येने उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांमुळे बहुकोनी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदासाठी तब्बल 82 अर्ज, तर नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवार मैदानात उतरल्यानंतर खेडच्या राजकारणात चुरस कमालीची वाढल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, उद्धव ठाकरे गट आणि स्वतंत्र उमेदवारांनी मोठ्या उत्साहाने अर्ज दाखल केल्याने प्रत्येक प्रभागात तिरंगी, चौकोनी तर काही ठिकाणी पंचकोनी लढत होण्याची शक्यता आहे. उद्याची छाननी आणि त्यानंतर जाहीर होणारी अंतिम यादी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूण 82 नगरसेवक आणि 8 नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या अर्जांची उद्या छाननी होणार असून कोणाचे अर्ज ग्राह्य धरले जातील आणि कोण रिंगणाबाहेर जाईल याची उत्सुकता सर्वच पक्षांना लागली आहे. अंतिम उमेदवारीची यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला गती मिळणार असून प्रभागनिहाय समीकरणेही अधिक स्पष्ट होणार आहेत. खेड नगरपरिषदेची ही निवडणूक अनेक गट-तटांमध्ये विभागलेल्या राजकीय वातावरणात होत असल्याने निकाल कोणत्या दिशेने झुकेल याबाबत तर्कांना उधाण आले आहे. मात्र सध्या तरी खेड शहर निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात अक्षरशः पेटलेले दिसत आहे.