गुहागर : गुहागर समुद्रचौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाच जीवरक्षकांचा पगार झाला नसल्याने गुरुवारपासून जीवरक्षक रजेवर गेले आहेत. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन पर्यटन हंगामात जीवरक्षकांनी असा पवित्रा घेतल्याने समुद्रकिनारी एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहराला सहा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. गुहागरमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले जीवरक्षकच समुद्रचौपाटीवर नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जीव रक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थकला आहे. याबाबत नगरपंचायत कार्यालयात त्यांनी विचारणा केली असता, पगार १० मेपर्यंत मिळू शकतो. दुसरे टेंडर होईल तेव्हा पगार मिळेल.
तोपर्यंत तुम्ही नाही आलात तरी चालेल असेही उत्तर दिल्याचे जीवरक्षक सांगत आहेत. मात्र पगाराची टांगती तलवार असल्याने गुरुवारपासून पाचही जीवरक्षक रजेवर गेले आहेत. यात निहार तोडणकर, साहील तोडणकर, अक्षय भागडे, परदेश तांडेल, अक्षय लोखंडे यांचा सामावेश आहे.
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांची मोबाईल नंबरसह नावे फलकावर लावण्यात आली आहेत. सहा किलोमिटरच्या या चौपाटीवर ठिकठिकाणी या पाचही जीवरक्षकांची नावे लावण्यात आली असल्याने समुद्रावर येणारे पर्यटक गेले दोन दिवस जीवरक्षकांना आपण समुद्रचौपाटीवर आहात का, याची विचारणा करत आहेत. काही सुजाण पर्यटक जीवरक्षकांना विचारून सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात जात आहेत. मात्र जीवरक्षक पगार थकल्यावर रजेवर गेल्याने चौपाटीवरील पर्यटकांच्या सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.