गणपतीपुळे : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे 6 जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे. नवीन वर्षातील पहिला अंगारकी योग जुळून आल्याने राज्यभरातून हजारो भाविक गणपतीपुळ्यात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्तहोत आहे. देवस्थान समितीने यात्रोत्सवासाठी चोख नियोजन केले असून पहाटे 3.30 वाजता स्वयंभू श्री गणपती मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.
मुख्य पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर व देवबाग परिसरात नियोजनबद्ध दर्शन रांगा उभारण्यात आल्या आहेत.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, मिरज, कराड, इस्लामपूर, कवठेमहाकाळ आदी घाटमाथ्यावरील भागांतून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. नववर्षातील संकल्पपूर्तीसाठी भाविक श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करणार असल्याने परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, जिल्हा पोलीस दलाकडून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली. समुद्र चौपाटी परिसरात विशेष गस्त ठेवली जाणार असून, ध्वनिक्षेपकाद्वारे समुद्राच्या धोक्याबाबत सतत सूचना दिल्या जाणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात काढण्यात येणार आहे. भाविकांना पहाटे 3.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अंगारकी निमित्त सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे.