Anuskura Ghat Heavy Traffic Ban
राजापूर : गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध शहरांतून कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अणुस्कुरा घाटातील अवजड वाहतूक पुढील काही दिवस तात्पुरती बंद ठेवावी, अशी जोरदार मागणी राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील जनतेतून होत आहे.
काही दिवसांपूर्वी कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबा घाटात तडे गेल्याने अवजड वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात ओणी-अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आली आहे. गेल्या महिन्याहून अधिक काळ या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याने ओणीपासून अणुस्कुरा घाटापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या मार्गावरील प्रवास धोकादायक आणि त्रासदायक बनला आहे.
त्यातच अणुस्कुरा घाट हा मुळातच अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. गेल्या काही दिवसांत अवजड वाहतूक करणारी वाहने घाटात बंद पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने अशा प्रकारची वाहतूक कोंडी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
अणुस्कुरा मार्गावर सध्या जळाऊ लाकूड वाहतूक करणारी वाहने, पेट्रोल टँकर, सिलिंडर व गॅस वाहतूक करणारी वाहने तसेच विविध प्रकारची मालवाहतूक करणारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. या वाहनांमुळे अरुंद घाटात अनेकदा वाहतुकीला अडथळे निर्माण होतात.
गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य शहरांतून चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे या काळात अणुस्कुरा घाटातून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत किमान काही दिवस अवजड वाहतूक बंद ठेवून चाकरमान्यांच्या वाहनांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवजड वाहतूक काही काळ बंद ठेवल्यास ओणी-अणुस्कुरा मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. तसेच गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही अडथळ्याविना आपल्या गावी पोहोचता येईल. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच अणुस्कुरा घाटातील अवजड वाहतुकीबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अणुस्कुरा घाट अत्यंत अरुंद आहे. दोन वाहने कशीबशी एकमेकांना क्रॉस होतात. अशा परिस्थितीत एखादे अवजड वाहन घाटात बंद पडल्यास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. एका बाजूला डोंगराची दरड तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने बंद पडलेले वाहन सहज बाजूला घेणेही शक्य होत नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी अणुस्कुरा घाटातील अवजड वाहतूक तात्पुरती बंद ठेवणे अत्यावश्यक आहे.