Anuskura Ghat | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अणूस्कुरा घाटातून अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी

बंद पडलेल्या ट्रकमुळे २४ तासांनंतरही वाहतूक सुरळीत नाही; अणूस्कुरा घाटात सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची मागणी
Anuskura Ghat
अनुस्कुरा घाटातून धिम्या गतीने सुरु असलेली वाहतूकPudhari Photo
Published on
Updated on

Anuskura Ghat Heavy Vehicles

राजापूर : अणूस्कुरा घाटात बंद पडलेला अवजड ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आल्यानंतर त्यातून वाट काढत दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी २४ तास उलटूनही ट्रक हटविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे घाटमार्गावरील वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अणूस्कुरा घाटातून अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अणूस्कुरा घाटातील अवघड वळणावर चौदा चाकी अवजड ट्रक बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस ठाणे आणि अणूस्कुरा चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

Anuskura Ghat
Anuskura Ghat landslide : अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली; तात्काळ हटवून घाटमार्ग पूर्ववत सुरु

मात्र, अवघड वळणावर ट्रक बंद पडल्याने तो पूर्णपणे हटविणे शक्य झाले नाही. त्यामुळे ट्रक काहीसा बाजूला करून त्याच्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या मार्गावरून सुरुवातीला अल्टो, वॅगनआरसारख्या लहान चारचाकी तसेच दुचाकी वाहनांनाच मार्ग काढता येत होता. अवजड आणि मोठ्या वाहनांची वाहतूक मात्र ठप्प होती.

त्यानंतर ट्रक आणखी बाजूला करण्यात आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, रस्त्यावर अडथळा कायम असल्याने घाटमार्गे सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे.

Anuskura Ghat
Anuskura Ghat landslide: अनुस्कुरा घाटात कोसळला महाकाय दगड; प्रशासनाची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी हातानेच हटवला

आंबा घाट बंद असल्याने अणूस्कुरा घाटावर वाढला ताण

गेल्या काही दिवसांपासून आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक अणूस्कुरा घाटाकडे वळविण्यात आली आहे. यामध्ये जळाऊ लाकूड वाहून नेणारी मोठी वाहने, गॅस सिलिंडर वाहने, पेट्रोल-डिझेलचे टँकर तसेच अन्य अवजड वाहनांचा समावेश आहे.

गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता

गणेशोत्सव जवळ आल्याने अणूस्कुरा घाटातील वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे परिसरातून कोकणात येणारे चाकरमानी मोठ्या संख्येने अणूस्कुरा मार्गाचा वापर करतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

याचा विचार करून गणेशोत्सव काळात अणूस्कुरा घाटातून अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अवजड वाहतूक आणि चाकरमान्यांची मोठी गर्दी एकाच वेळी झाल्यास घाटात वाहतूक कोंडीसोबतच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Anuskura Ghat
Anuskura Ghat | अणुस्कुरा घाटाचे होणार डांबरीकरण, शासनाकडून 5 कोटीचा निधी मंजूर!

दरडी, बंद पडणाऱ्या वाहनांमुळे घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न

चालू पावसाळ्यात अणूस्कुरा घाटात दरड कोसळणे, अवजड वाहने बंद पडणे आणि त्यामुळे घाटमार्ग ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अणूस्कुरा घाटातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतुकीचे नियमन, आपत्कालीन यंत्रणा आणि बंद पडलेली वाहने तातडीने हटविण्याची व्यवस्था याबाबत प्रशासनाने ठोस नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news