Amba Ghat : आंबा घाट लवकरच वाहतुकीसाठी सज्ज

दरड कोसळलेल्‍या, खचलेल्‍या भागाच्‍या दुरुस्‍तीचे काम आठवडाभरात होणार सुरू
Amba Ghat
आंबा घाटFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अतिशय महत्त्वाचा असलेला आंबा घाट लवकरच पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. घाटातील दरड कोसळलेल्या आणि खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम आगामी एका आठवड्यात नव्या जोमाने सुरू होणार आहे. माती परीक्षणानंतर आता रेल्वेच्या कामाचा दांडगा अनुभव असलेल्या ‘मेकॅथेरी’ या नामांकित कंपनीकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, संपूर्ण कामाची मदार आता पावसाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

घाटातील ज्या भागाची माती खचली होती. तेथील नमुने गोळा करून तज्ज्ञांकडून तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या भागाची पाहणी केली असता, वर ५ मीटर मातीचा थर असून खाली मजबूत कातळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षेची पूर्ण काळजी घेत थेट कातळापर्यंत सुमारे ५ मीटर उंचीची भक्कम भिंत उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, या दुरुस्तीसाठी अत्यंत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यात ‘एअर डोम’चा अवलंब केला जाईल. छत्रीच्या आकारासारख्या असणाऱ्या या विशिष्ट डिझाईनमुळे पावसाचे पाणी संबंधित भागात न मुरता थेट व्हॅलीमध्ये (दरीत) वाहून जाण्यास मदत होईल, ज्यामुळे भविष्यात दरड कोसळण्याचा धोका टळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी प्रभावित झालेल्या या घाटातील रस्ता पूर्ववत करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत मजबूत पद्धतीने हे काम होणार असल्याने प्रवाशांना भविष्यात सुरक्षित प्रवास करता येणार आहे. पावसाने विश्रांती दिल्यास निर्धारित वेळेत काम पूर्ण करून घाट लवकरात लवकर वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाईल, अशी आशा यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news