देवरुख, पुढारी वृत्तसेवा :
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मयत सुधीर यादव यांच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७) याचे बिंग फुटले आहे. तपासाअंती देवरुख पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे, सुरुवातीला "मित्र गाडीतून उतरला आणि पडला" अशी खोटी माहिती देणारा तक्रारदारच अखेर खुनी निष्पन्न झाला आहे. सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुधीर अर्जुन यादव (वय ३०) आणि आशिष शांताराम भावके हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक व मित्र होते. हे दोघेही रत्नागिरी येथील आरेवारे येथे पर्यटनासाठी फिरण्यासाठी आले होते.
तेथे त्यांनी मद्यपान आणि जेवण केले. परतीच्या प्रवासाला निघाले असताना ३१ मार्च २०२६ रोजी रात्री २३.३० च्या सुमारास महामार्गावरील मौजे दख्खन गावच्या हद्दीत दोघांमध्ये दारूवरून वाद झाला. मयत सुधीरने "आणखी दारू पाहिजे" या हट्टापायी आशिषच्या एर्टिगा कार (MH-50-N-4642) च्या बोनेटवर बसून काच फोडली. याचा राग आल्याने आशिषने सुधीर बोनेटवर असतानाच गाडी चालवली, ज्यामुळे सुधीर खाली पडला आणि गंभीर जखमी झाला.
आरोपीने त्याला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला होता. सुरुवातीला आशिषने पोलिसांना माहिती दिली होती की, सुधीर गाडीतून पडल्यामुळे जखमी झाला आहे. मात्र, देवरुख पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (AD No. 12/2026) सखोल चौकशी केली असता, आशिषने सुधीरला जाणीवपूर्वक मृत्यूच्या खाईत ढकलल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तपास केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.