खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून आधुनिक रस्ते बांधले गेले. पण या विकासाच्या गोंगाटात भरणे येथे महामार्गाच्या अंडरपासजवळील संरक्षक भिंतींवर उभारलेली छत्रपती शिवराय आणि मावळ्यांचा शौर्य सांगणारी भव्य चित्रे आज पांढऱ्या-करड्या धुरकट थराखाली गुदमरून गेली आहेत.
ज्यांनी छत्रपतींचे युद्धदृश्य, रायगडाचा दरवाजा, मावळ्यांची छायाचित्रे इतक्या प्रेमाने रेखाटली, त्यांचे श्रम आज वाया गेल्यागत दिसत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी तर या भित्तिचित्रांवर जाहिरातींचे पोस्टर लावून विद्रूप करणारा निर्लज्जपणाही करण्यात आला आहे. कोकण दर्शनाचीही अशीच दुर्दशा झाल्याची भावना व्यक्त होत आहे. लोटे घाणेखुंट परिसरात कोकणचे सुंदर दर्शन घडवणारी निसर्गचित्रे काढली गेली. पण रस्त्याकडेला कचरा जाळण्याची प्रवृत्ती आणि प्रशासनाची बेफिकिरी यामुळे ही चित्रेही आगीच्या ज्वाळांनी काळवंडली गेली आहेत.