चिपळूण : शहरानजीक कळंबस्ते गावच्या हद्दीत कळंबस्ते-धामणंद रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ एका वाहनात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे मद्य असल्याची खबर मिळाल्याने उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करत तब्बल 2 लाख 58 हजार 960 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रवीण गणपत तांबिटकर (रा. वालोपे तांबिटकरवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये गोलन एस् व्हिस्की (गोवा राज्यनिर्मित) या नावाचे 750 मिलीचे 22 बॉक्स 264 बाटल्या (रु.1,68960), 90 हजारांची एक मारुती 800 गाडी (एमएच-04-एएक्स-7050) असा एकूण 2 लाख 58 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस. मालुसरे, तसेच व्ही. एस. विचारे, मयूर पुरीबुवा यांनी केली. या आधी ऑगस्ट महिन्यातही अशा प्रकारे धाड टाकून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी याच संशयितांकडून साडेपाच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करून कारवाई केली होती. चार महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडूनच दारू जप्त करून कारवाई करण्यात आली.