चिपळूण शहर : शहरातील मार्कंडी येथील युनायटेड इंग्लिश स्कूलनजीकच्या एका रहिवास ठिकाणच्या खासगी जागेत एका भल्या मोठ्या झाडाच्या सुकलेल्या फांद्या रस्त्याच्या बाजूने झुकल्या आहेत. त्या कधीही मोडून रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे. हा परिसर कायम वर्दळीचा असल्याने सुकलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे सुकलेले झाड व फांद्या तोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील गुहागर-विजापूर या मुख्य वर्दळीच्या मार्गावर मार्कंडी मेहता पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या एका खासगी जागेत मोठे वृक्ष आहेत. त्यापैकी एका वृक्षाच्या फांद्या पूर्णपणे निकामी होऊन सुकलेल्या आहेत. या फांद्या रस्त्याच्या मध्यापर्यंत झुकलेल्या असून, या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. तसेच पादचारी, वाहनांची वर्दळ असते. बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी वर्दळ असते. या सुकलेल्या फांद्या रस्त्यावर कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषदेने या सुकलेल्या फांद्या तातडीने तोडाव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.