

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा
शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी येथील कचरा डेपोमध्ये शनिवारी १० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास केवळ एक दिवसाचे जिवंत नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती जितेंद्र ऊर्फ दादा कदम यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दादा कदम यांच्यासह आनंद कट्टीमणी, परशुराम धोत्रे, सागर चव्हाण यांनी तातडीने त्या अर्भकाला उचलून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अर्भकावर तेथील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून शहर पोलिसांनाही ली याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे कचऱ्यात उघड्यावर सोडून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. शहर पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयांमधील नोंदी तपासत आहेत.