

रत्नागिरी ः तालुक्यातील वेताशी-धनगरवाडी येथे शनिवारी दुपारच्या सुमारास आंबा कलमांच्या बागांना आग लागली. या आगीत एकूण पाच आंब्यांच्या बागा जळून खाक झाल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धनगरवाडी येथील कृष्णा बाबू झोरे यांच्या आंबा बागेत विहिरीजवळ पंप हाऊसमध्ये आग लागली. सुरवातीला ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले होते. मात्र काही वेळाने अचानक आगीचा पुन्हा भडका उडाला आणि बघता-बघता आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत कृष्णा बाबू झोरे, शांताराम धाकल्या झोरे, बबन कोंड्या झोरे यांच्या आणखी चार आंबा बाग पूर्णपणे जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत पाचही आंब्याच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण बँकेचे प्रतिनीधीही घटनास्थळी दाखल झाले. या आगीत पाचही बागायतदारांच्या हाती तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेबाबत पुढील पंचनामा व तपास सुरु आहे.