रत्नागिरी : मिरजोळेतील भक्ती मयेकर खुनातील मुख्य आरोपी व तिचा प्रियकर दुर्वास पाटील याने खंडाळा येथील त्याच्या देशी दारू बारमध्ये सीताराम वीर याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली व यातच त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार वीर याच्या नातेवाईकांनी जयगड पोलिसांकडे केली आहे. ही मारहाण करताना बारमधील राकेश जंगम या वेटरने पाहिले होते. त्यामुळेच त्याचाही गळा आवळून खून करत मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून देण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.
कळझोंडी येथील सीताराम वीर हा प्रेयसीच्या खुनातील आरोपी प्रियकर दुर्वास पाटील (रा. वाटद खंडाळा, तालुका रत्नागिरी) याच्या बारमध्ये दारू पिण्यासाठी येत होता. एप्रिल 2024 मध्ये वीर याचे बारमध्ये भांडण झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खंडाळा येथे राहणार्या राकेश जंगम याने ही मारहाण झालेली पाहिली होती. पोलिसांनी आपल्याला विचारले तर दुर्वास पाटील यानेच मारहाण केल्याचे सांगणार हे बार मालक दुर्वासला सांगितले होते. त्यामुळे दुर्वास पाटील या आरोपीने त्याचा बार मॅनेजर विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांच्या मदतीने खून केला असावा असा संशय आहे. एप्रिल महिन्यात मारहाणीची घटना झाल्यानंतर 31 ऑगस्ट रोजी राकेश जंगम या वेटरचा खून करण्यात आला. कोल्हापूरला जावून येवूया असे सांगून राकेश जंगमला कारमधून नेताना गळा आवळून जीव घेण्यात आला. त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकण्यात आल्याचे आरोपी दुर्वास पाटील याने यापूर्वीच कबूल केले आहे.
मिरजोळेतील भक्ती मयेकर नामक प्रेयसीने विवाहासाठी तगादा लावला होता, परंतु दुर्वास पाटीलला दुसरीशीच लग्न करायचे असल्याने भक्तीला खंडाळ्यातील बारमध्ये बोलावून बारच्या वरच्या रुममध्ये केबलने गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर मृतदेह आंबा घाटातीलच दरीत फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी दुर्वाससह त्याचा मॅनेजर विश्वास पवार, सुशांत नरळकर या तिघांना अटक करण्यात आली. हे तिन्ही आरोपी पोलिस कस्टडीत असतानाच राकेश जंगम खुनातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या निलेश भिंगार्डे याला सांगलीतून अटक करण्यात आली. या खुनात प्रेयसीच्या खुनातील आरोपी सुशांत नरळकरचा संबंध नाही. दरम्यान, सीताराम वीर यांचा मृत्यू दुर्वासने केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याचा गुन्हा जयगड पोलिसांकडे दाखल झाला आहे.