

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ संलग्नित बीपीए म्हणजेच बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्टस् हा व्यावसायिक अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठांमध्ये सर्वप्रथम रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांनी सुरू केला आहे. कलेच्या व्यावसायिक शिक्षणाबरोबरच आर्टस्, कॉमर्सचे करिअरसाठी आवश्यक असणारे विषय घेऊन पदवी घेणारे पहिले महाविद्यालय मुंबई विद्यापीठात ठरले असून प्रवेशाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता मुंबईसह विविध विद्यापीठात जाऊन नाट्यशास्त्र, ललित कला विभागात शिक्षण घेण्याची गरज नाही, रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रत्नागिरीतच गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिनयाची पदवी घेता येणार आहे.
हल्ली करिअरची व्याख्या बदलत चाललेली आहे. करिअर फक्त पैसे कमवायला नव्हे, तर आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करून त्यातून उत्पन्न मिळवणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून आधी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल हे ठरवून कोर्स निवडला तर अडचण येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना नाटक, डान्स, संगीतमध्ये आवड आहे त्यांना बीपीए हा कोर्स करिअरसाठी सर्वोत्तम आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हा वर्षाला 3 ते 7 लाखांचा पॅकेज अथवा कमाई करू शकतो.
मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या रत्नागिरीमधील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने आता बॅचलर ऑफ परमॉर्मिंग आर्टस् हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहे. नाट्य, संगीत हे मेजर विषय घेवून इतर कला क्षेत्रातील लेखन कौशल्य, सूत्रसंचालन कौशल्य, फाईन आर्ट कौशल्य, डिजिटल कौशल्य, स्थानिक कल्चरल हेरिटेजचा अभ्यास करून पर्यटन विकासाची जाणीव निर्माण करणारा अभ्यासक्रम, इव्हेंट मॅनेजमेंट अशा जीवनामध्ये सर्व क्षेत्रात स्वावलंबी होवून व्यावसायिक स्वावलंब होण्यासाठी हे सर्व विषयी पडत असतात. हे सर्व विषय प्रॅक्टिकलवरती आधारित असल्याने थेरीचा विषय कमी असतो आणि प्रत्याक्षिकवर जास्त भर दिला जातो. पहिल्याच वर्षी दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त झाले आहे. विद्यार्थी, शिक्षकांनी एकत्र येवून फोक आर्केस्ट्रा सारखा व्यावसायिक कार्यक्रम सादर केला. विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. हरेश केळकर, प्रा. कश्मिरा सावंत आदी मेहनत घेत आहेत.