

रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गणेशोत्सवात ढोल- ताशा ध्वज पथकाला मोठी मागणी असते. जिल्ह्यात लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपरिक वाद्याची क्रेझ पाहायला मिळते. ताल व लयबद्ध वादनाने ढोलताशा पथक सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या ठिकठिकाणी ढोल- ताशा पथकातील सदस्य कसून सराव करताना दिसत आहेत.
वरुणराजा बरसत असताना जिल्ह्यात सर्वत्रच कानावर ढोलकी, टाळ तसेच ढोल-ताशांचे आवाज सध्या येत आहे. जिल्ह्यात अनेक ढोलताशा पथक आहेत. डिजे व बॅन्जोपेक्षा आता पारंपरिक वाद्यांना सध्या मागणी वाढत आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये मिरवणक. शोभायात्रांमध्ये हमखास ढोल- ताशा पथकांना आमंत्रित केले जाते. या पथकांकडून सामाजिक उपक्रमही राबवले जातात. गणेशोत्सवाच्या बाप्पांचा साधारण दीड- महिने आधीपासून शक्ती-तुरा नाचासाठी तसेच ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होतो. बहुतांश पथक सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सराव करतात.
यात अवघ्या सहा वर्षांपासून 45 वर्षांपर्यंतचे सदस्य असतात. तर काही जण केवळ हौसेखातर प्रशिक्षण घेतात. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. जिल्ह्यात ढोल ताश्यांबरोबरच शक्ती-तुरा नाचाची डबल बारी रंगते. त्याच्या जोडीला भजनही असते. हे सर्व कलाकार सध्या सराव करताना दिसत आहेत. घरोघरी उत्सवाच्या कालावधीत हे सर्व पहायला मिळते.
बहुतांश ढोलपथक आपला नवीन ठेका व ताल यांचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतात. यात 1 ते 5 असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असेही म्हटले जाते. तर काही ठिकाणी प्रशिक्षणासाठी पथकातील तज्ज्ञांना बोलावले जाते.