रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी आगाराला लक्ष्यापेक्षा कमी उत्पन्न मिळाल्यास आगार व्यवस्थापकासह विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न मिळविणाऱ्या व्यवस्थापक, विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना समज देण्यास सुरूवात झाली आहे.
त्यानंतर ही उत्पन्न न वाढल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील विविध बसस्थानकात आता नव्या कोऱ्या बसेस आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाने मागील काही काळात भाडेवाढ करूनही अपेक्षित महसूल वाढलेला नाही.
डिझेलचे वाढते दर, देखभालीचा खर्च यामुळे भाडेवाढीचा फायदा नग्ण ठरत आहे. महामंडळाने प्रत्येक बसमागे प्रतिकिलोमीटर ७० रूपये उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र सध्या अनेक विभागाची कामगिरी आवधी ५५ ते ६० रूपयापर्यंतची आहे.
किलोमीटर मागे १० ते १५ रूपयांची तूट भरून काढण्यासाठी अधिऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, एसटीचा गल्ला काय वाढत नसल्याचे चित्र आहे. ज्या विभागाचे उत्पन्न लाखापेक्षा कमी आहे.
त्यांना सध्या समज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर त्यातही सुधारणा न दिसल्यास थेट बदली अन्यथा अवनतीसारख्या कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात काही आगार नफ्यात तर काही तोट्यात असल्याचे सांगण्यात आले.
गर्दीच्या ठिकाणी जादा बसेस...
रत्नागिरी विभागात ज्यामार्गावर गर्दी आहे, तिथे जादा बसेस सोडणे, आरटीओ, पोलिसांच्या मदतीने बसस्थानक परिसरातील अवैध वाहनांवर कारवाई करणे, प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीतून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली आहे.
उत्पन्न न वाढण्याची 'ही' आहेत कारणे...
विविध बसस्थानकाबाहेर होणारी अवैध बडाप, खासगी बसेसची बेकायदेशीर वाहतूक, वेळेवर बसेस न सोडणे, अचानक बस रद्द होणे, कमी बसेस असणे, वाढती गर्दी-बसण्यास जागा न मिळणे या विविध कारणामुळे प्रवासी खासगी बसमधून प्रवास करत आहे.