

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
बेदरकारपणे दुचाकी चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात दोन दुचाकींना धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर येथील तरुणाचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना शनिवारी (१० जानेवारी) दुपारी ११.३५ वा. सुमारास भाटीमिऱ्या एसटी बसथांब्याजवळ घडली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संस्कार सरदार कांडर (२०, रा. पन्हाळा कणेरी, कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात सुप्रिया सचिन बडवे (५५, रा. जाकिमिऱ्या ग्रामपंचायत, रत्नागिरी), दिग्विजय दीपक पाटील (२३, रा. पन्हाळा कणेरी, कोल्हापूर), अथर्व संजय भोईर (३०, रा. अंबरनाथ, ठाणे) आणि केशव राजबहादूर कुशवाह (२३, रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) हे चारजण जखमी झाले आहेत.
या बाबत सुप्रिया बडवे यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी सुप्रिया बडवे आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचकी (एमएच-०८-बी. जी-६६६९) घेउन रत्नागिरी ते सडामिऱ्या रस्त्याने जात होत्या. त्यांच्या दुचाकीच्या मागून संस्कार कांडर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०९-ई. एच.-१९८३) वर मागे दिग्विजय पाटील याला बसवून रत्नागिरी ते सडामिऱ्या असा जात होता.
ही दोन्ही वाहने भाटिमिऱ्या येथील एसटी स्टॉपजवळून जात होती. त्याच सुमारास अथर्व भोईर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-बी. एच.-८४४५) वर मागे केशव कुशवाह याला बसवून सडामिऱ्या ते रत्नागिरी असा येत असताना त्याचा दुचाकीवारील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात सुप्रिया बडवे आणि संस्कार कांडर यांच्या दोन्ही दुचाकींना धडक देत अपघात केला. दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे तिन्ही दुचाकींवरील सर्व जण रस्त्यावर फेकले गेले.
यात सर्वांना दुखापत झाल्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर स्थानिकांनी सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान संस्कारचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सूरु होती.