

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वास्को शहराच्या विकासासाठी केंद्राकडून १५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच वास्को शहराचा वेगळ्या पद्धतीने कायापालट होणार आहे. येथील जनतेला शहराचे परीवर्तन झालेले पहायला मिळणार आहे. या विकासासाठी सर्व जनतेचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी केले.
वास्को शहरात बांधलेल्या नवीन मासळी मार्केट इमारतीचे शनिवारी १० रोजी नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच संपूर्ण स्वतंत्रपथ आणि एफ. एल. गोम्स मार्ग परिसर सौंदर्याकरण प्रकल्प कामाचा प्रारंभझाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, नगरसेविका शमी कृष्णा साळकर, पालिका संचालक ब्रिजेश मणेरकर, पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक व पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री विश्वजित राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचा चौफेर विकास होत आहे. यात वास्को शहराचाही मास्टर प्लान तयार केला आहे. आमदार कृष्णा साळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वास्को शहराचा विकास प्रगतीपथावर असून येणाऱ्या काळात वास्को शहराचा कायापालट झालेला पाहायला मिळणार आहे.
आम्ही सत्तेचा उपयोग लोकांसाठी करत असल्याचे यातून सिद्ध होते. आम्ही लोकांना पुढे घेऊन जातो. तसेच इच्छाशक्तीमुळेच प्रत्येक काम प्रगतीपथावर जाते असे ते म्हणाले. लवकरच २० कोटींचा सिग्नेचर प्रकल्प वास्को शहराला कृष्णा साळकर यांच्या नेतृत्वात्वात्य मिळणार असून त्याचीही पायाभरणी लवकरच होणार आहे असे ते शेवटी म्हणाले. मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, आम्ही गोवेकर माशांचे दर्दी. त्यामुळे वास्कोचे मासळी मार्केट कधी होणार या विवंचनेत वास्कोवासीय होते.
आज हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. पुढील एक वर्षात वास्को शहर नवे रूप धारण करणार आहे. पालिकेतील सर्व नगरसेवकांच्या सामंजस्यपणामुळे व स्थिरतेमुळे हे साध्य होत आहे. या प्रकाल्पामुळे टीका झाली. मात्र, काम करत राहिल्याने हा प्रकल्प पूर्ण झाला. आता याची निगा राखणे पालिकेची जबाबदारी असे ते शेवटी म्हणाले. नवीन वर्षात वास्कोतील नवीन मासळी मार्केट प्रकल्पाचे उद्घाटन करून सरकारकडून मुरगाव तालुक्यातील नागरिकांना चांगल्या प्रकल्पाची भेट देण्यात येत असल्याचे आमदार साळकर म्हणाले. वास्कोत सध्या अनेक प्रकल्पांची कामे जोरात चालू असून, लवकरच विकसित वास्को पहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराचा कायापालट करणार : साळकर
आमदार साळकर म्हणाले की, ५० वर्षांपासून वास्कोत चांगला विकास व्हावा, अशी जनता प्रतीक्षा करत थांबले होते. वास्को मतदारसंघात उत्कृष्ट विकास होण्याबरोबरच वास्को शहर एकदम सुंदर व्हावे असे स्वप्न ठेवून आम्ही काम केले असून, हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुढचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील जनतेला वास्को मतदारसंघात मोठा विकास झालेला दिसून येण्याबरोबरच वास्को शहराचा कायापालट दिसून येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.
दरानुसार गोळा होणार सोपो कर...
विक्रेत्यांना नव्या मार्केटात हलविण्यासाठी मुख्याधिकारी नाईक यांनी आदेश जारी केला आहे. नवीन मार्केटाची देखभाल पालिका करणार आहे. पालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार सोपो गोळा करण्यात येईल. तसेच सोपो दर वेळोवेळी वाढविला जाईल. या मार्केटाच्या आराखड्यात मासे विक्रेत्यांसह फळे, भाजीपाला विक्रेते मिळून ३५० जणांची सोय आहे.