देवरुख : पुढारी वृत्तसेवा
आंबाघाट मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामावरून स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. देवरुख, मुरादपूर, हातिव, निवे, कोळवण, आंगवली, बोंडे, मारळ (मार्लेश्वर), बामणोली, ओझरे बु., निनावे ते कळकदरा या सुमारे ३० ते ३५ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील कामामुळे १० ते ११ गावांतील शेकडो नागरिक प्रभावित होत आहेत.
सध्या अस्तित्वात असलेला रस्ता केवळ १२ ते १५ फूट रुंदीचा असून, वाहतुकीचा मोठा ताण नसतानाही रस्ता दोन्ही बाजूंनी सुमारे १० फूट वाढवण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या कामामुळे अनेकांच्या शेतीजमिनी, घरे आणि दुकाने धोक्यात आली असून उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जमीन अधिग्रहणाबाबत कोणतीही अधिकृत नोटीस, अधिसूचना किंवा मोबदल्याची घोषणा न करता काम सुरू करण्यात आले आहे. सामाजिक परिणाम अभ्यास न करता तसेच हरकती नोंदवण्याची संधी न देता काम केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विकासकामांना विरोध नसून, योग्य मोबदला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जमीन घेणे मान्य नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी योग्य निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार दाखल करून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.