राजापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजितदादा पवार यांचा फारसा राजापूर दौरा झाला नव्हता. मात्र दोन वेळा ते राजापूर तालुका दौऱ्यावर आले होते. दोन्ही वेळा त्यांनी केवळ पक्ष कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.
ज्यावेळी राज्यात काँग्रेस प्रणित आघाडीचे सरकार होते. त्यावेळी अजितदादा राजापूर दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांचे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या कडून स्वागत झाले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. उपस्थित जनता आणि पक्ष कार्यकर्ते यांनी दादांना अनेक निवेदने दिली होती.
त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या युती शासनाच्या सन २०१४ ते २०१९ या सत्ता काळातील कारभाराविरोधात तत्कालीन विरोधी पक्षाकडून राज्यव्यापी यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी आघाडीचे अनेक नेते त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, यासह दिग्गज नेते राजापूर मध्ये आले होते.त्यावेळी राजापूरच्या विद्यमान नगराध्यक्षा ऍड हुस्नबानू खलिफे मॅडम राज्यपाल पुरस्कृत विधानपरिषदेवर सदस्या होत्या.
राजापूरच्या जवाहर चौकातील पिकअप शेड मध्ये एक छोटीशी सभा पार पडली होती.मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील तटकरे यांचेच भाषण झाले होते. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणी बोलले नव्हते. स्वतः अजितदादा राजापूर मध्ये दोन्ही वेळी बोलले नव्हते. मात्र त्यावेळीही कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या भोवती होता. जनमानसातील नेता अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या राजापूरच्या दोन्ही दौऱ्यात त्याचे दर्शन घडले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्या आठवणीं जाग्या झाल्या.