20 Years Punishment For Minor Girl Assault
चिपळूण : तालुक्यातील एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलीला जंगलात पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी संदेश सोमा बारे (रा. गोंधळे, ता. चिपळूण) यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
चिपळूण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने आणखी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे. या शाळकरी मुलीला ४ ऑगस्ट २०१९ रोजी पळवून नेऊन आरोपी संदेश सोमा बारे याने वेगवेगळ्या ठिकाणी तसेच जंगलमय भागात नेऊन वेळोवेळी बलात्कार केला.
पीडित मुलीच्या आईने चिपळूण पोलिस स्टेशनला मुलगी हरवल्याबाबत तक्रार दिली होती. त्यामुळे सुरुवातीला बेपत्ता म्हणून गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर सात दिवसांनी पीडित मुलगी एका निर्जन ठिकाणी पडीक घरात आरोपीने नेऊन ठेवल्याचे आढळले. त्यामुळे पीडित मुलीला आणि आरोपी यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले आणि पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. या जबाबात आरोपीने पीडित मुलीला जंगलात पळवून नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील न्यायालयात जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्यासमोर सुरू होती. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासह एकूण १० साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी घेतली.
'पोक्सो'च्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी योग्य शिक्षा
पोक्सो कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याची प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली. या खटल्याकामी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. तसेच, तपास अंमलदार पोलिस निरीक्षक संदीप वांगणेकर यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला व पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी काम पाहिले. यातून अशा गुन्ह्याला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.