रत्नागिरी ः पुढारी वृत्तसेवा
देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच रत्नागिरीतही असा प्रकार उघडकीस आला आहे. परिचारिका प्रशिक्षणासाठी येणार्या 19 वर्षीय युवतीला बेशुद्ध करून शहरानजीकच्या चंपक मैदानातील जंगलमय भागात नेऊन एका रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या संबंधित युवतीच्या तपासणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदू जनजागृती संस्थांसह सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
घटनाक्रम
सकाळी सव्वासात वाजता युवती बसस्टॉपवर उतरली
रिक्षात बसताना चालकाने दिलेले पाणी प्यायल्याने गुंगी आली
दीड तासानंतर ती शुद्धीवर आली.
तिने बहीण व पालकांशी संपर्क साधला
नातेवाईकांनी पीडितेस घरी आणून रुग्णालयात दाखल केले
पोलिस यंत्रणेची धावपळ
जबाब नोंदवून दुपारी बलात्काराचा गुन्हा दाखल
बंद सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे तपासात अडथळे
तर रुग्णालयातील कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करून आरोपीला तत्काळ अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील या प्रक्षोभानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते की काय? अशी शक्यता होती. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांची समजूत काढली तर कर्मचार्यांची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी कडक कारवाईच्या आश्वासनानंतर कामबंद मागे घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे कर्मचार्यांनीही आपले कामबंद आंदोलन मागे घेतले. शहरात मात्र दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते.
रत्नागिरी शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण संस्थेत ही विद्यार्थिनी नर्सिंगच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. ती मुळची देवरुख येथील असून सध्या साळवी स्टॉप परिसरात वास्तव्याला आहे. प्रशिक्षण संस्थेस रविवारी सुट्टी असल्याने ती घरी गेली होती. सोमवारी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहण्यासाठी सकाळी ती नेहमीप्रमाणे 6 वाजता सुटणार्या बसने देवरुखहून रत्नागिरीत आली. या ठिकाणी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ती साळवी स्टॉप येथे उतरली. स्टॉपवरील रिक्षा न करता तिने जे. के. फाईल्स येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्या एका शेअर रिक्षाला हात केला. यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा वळवून उभी केली. त्यामुळे ही मुलगी रस्त्याच्या विरुध्द बाजुला रिक्षात बसण्यासाठी गेली. बसमधून उतरल्यामुळे थोडेसे अस्वस्थ वाटत होते. यावेळी रिक्षा चालकाने तिला पाणी पिण्यासाठी दिले. त्यानंतर आपण बेशुध्द झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. बेशुध्द अवस्थेतून जेव्हा जाग आली, त्यावेळी ती चंपक मैदानातील झाडी व कचरा असलेल्या ठिकाणी पडलेली होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. हातावर ओखडले असल्याच्या जखमा होत्या. तिच्याकडील वस्तू इतरत्र टाकून दिलेल्या होत्या.
शुद्धीवर आल्यानंतर या युवतीने सर्व वस्तू गोळा करुन तिने आपल्या बहीणीला मोबाईलवरुन कॉल केला. त्यावेळी सुमारे पावणेनऊ वाजले होते. वाहनांच्या आवाजावरुन ती रस्त्यावर आली. त्या ठिकाणाहून येणार्या दुचाकीस्वाराला तिने हात दाखवला व आपल्या बहिणीशी बोलणे केले. तिने आपल्या आईवडिलांनाही या घटनेची कल्पना दिली. बहिणीने सांगितल्याप्रमाणे दुचाकीस्वाराने तिला गर्दी असलेल्या चर्मालयाच्या चौकात आणून सोडले. यावेळी तिच्या वडिलांच्या ओळखीचे व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि ते तिला ताब्यात घेऊन आपल्या फ्लॅटवर गेले. यानंतर तिचा चुलत भाऊ व अन्य नातेवाईक त्या ठिकाणी आले. साडेनऊ वाजता तिचे आईवडील आल्यानंतर पोलिसांच्या 112 हेल्पलाईनला कॉल करण्यात आला.
आईवडिलांनी व भावाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याचवेळी पोलिसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रुग्णालयात येत, तातडीने उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना दिल्या. त्यावेळी युवती मानसिक तणावाखाली होती. या प्रकाराने हादरलेल्या मुलीकडून प्रत्यक्ष घटना जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यानुसार पोलिसांची पथके तातडीने सीसीटीव्ही व अन्य पुरावे गोळा करण्यासाठी रवाना झाली. अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी पीडित युवतीला धीर देत, घटनाक्रम जाणून घेतला त्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन त्यांनी मुलीच्या जबाबाप्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता 64 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील बहुतांशी भागातील पोलिस विभागाकडून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. सोमवारी सकाळी 19 वर्षीय मुलीवर चंपक मैदान येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी तपास करताना या बंद सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे पोलिसांच्या तपासात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी साळवी स्टॉप ते चंपक मैदान जाणार्या हॉटेल आणि दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजचा वापर आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी केला आहे.