कोकण

रत्नागिरी : मेढे येथे भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा ऐवज लांबवला

अविनाश सुतार

साडवली : पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असताना साखरपा नजीकच्या मेढे तर्फ देवळे येथील बंद घर चोरट्यांनी भरदिवसा फोडले. त्यानंतर घरातील ४ लाख १३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ३६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. ऐन शिमगोत्सवात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने साखरपा परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या घटनेची फिर्याद संग्रामसिंह पुंडलीक राजपूत यांनी दिली आहे. संग्रामसिंह राजपूत हे गुरुवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी चोरट्यांनी साधून घराच्या समोरील दरवाजाला लावलेले कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील दागिने रोख व रक्कम लंपास केली आहे. सायंकाळी राजपूत पुन्हा घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ साखरपा पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार नोंदवली. साखरपा पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला आहे. तर पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

संग्रामसिंह राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीत ८० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा पुतळी हार, १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, १ लाख ७३ हजार रुपये किंमतीचे दोन डवली असलेले सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किंमतीचे कानातली सोन्याची पुतळी असे एकूण ४ लाख १३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ३६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे नमूद केले आहे. हा चोरीचा प्रकार गुरुवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. दरम्यान, राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहे.

मेढे तर्फ देवळे येथील चोरीच्या घटनेबरोबरच साखरपा येथील विजय कृष्णाजी लोटणकर व दिनेश गंगाराम पांचाळ यांची घरे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला आहे. दरम्यान, ऐन शिमगोत्सवात भरदिवसा साखरपा परिसरात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

SCROLL FOR NEXT