कोकणात शिमगोत्सवाचा जोमात; आरवलीत शिमगा जल्लोषात साजरा

आरवली ; पुढारी वृत्तसेवा कोकणात सध्या शिमगोत्सवाचा फिवर चढला आहे. कोकणात कोरोनाचे निर्बंध दोन वर्षानंतर उठल्यानंतर माखजन आरवली परिसरात शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. माखजनचा हिंदू-मुस्लिम एकतेचा प्रतीक असणारा वाघजाई देवस्थानचा प्रसिद्ध होळी सण (शनिवार) साजरा होत आहे. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान माखजन सहाणेवर होळी पेटवण्यात येणार आहे.
शिमगा सणासाठी माखजन आरवली भागात चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. प्रत्येक गावात होळीच्या काही रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात. शिवाय, या ठिकाणी असलेल्या होळी आणि उत्साह हा पाहण्यासारखा आहे.
माखजनचा शिमगोत्सव हा ११ वाड्या एकत्र येत साजरा करतात. शनिवारी होळी झाल्यावर देवांची पालखी घरोघरी जाईल. ग्रामस्थ भक्त मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत करतात. या सणात मुस्लिम बांधवही सहभागी होतात. दोन वर्षांच्या कालावधी नंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय होळी दणक्यात साजरी करण्यात येत आहे. आरवली, कोंडीवरे, बुरंबाड, आंबव, करजुवे, कासे आदी गावात आज होळी साजरी करण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे शिमगा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा मिरजोळे ग्रामस्थांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे लोकांचा उत्साह कमी होता. मात्र यावर्षी निर्बंध कमी झाल्यामुळे चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत.
रत्नागिरी शेजारील मिरजोळे गावातील कालिकादेवीच्या शिमगोत्सवासाठी सुद्धा चाकरमानी मिरजोळे गावात दाखल झाले आहेत मिरजोळे गावचे मानकरी व शिमगा प्रमुख शरद गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी शांततेत व उत्साहात शिमगा सुरू आहे.