कोकण

रत्नागिरी : माजी आमदार संजय कदम यांना एसीबीची नोटीस

मोहन कारंडे

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना एसीबीने दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. संजय कदम ५ मार्च रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मतदारसंघात तयारी सुरू असतानाच कदम यांना एसीबीने नोटीस बजावली असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संजय कदम हे पूर्वीचे शिवसेनेचे कट्टर समर्थक होते. मात्र पक्षाअंतर्गत मतभेत झाल्याने त्यांनी शिवसेनेशी फारकत घेत राष्ट्रवादीत हजारो शिवसैनिकांसह प्रवेश केला. त्यानंतर ते आमदार झाले. रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे कट्टर विरोधक म्हणून संजय कदम यांना ओळखले जाते. शिवसेनेत ठाकरे-शिंदे असे दोन गट पडल्याने रामदास कदम यांनी शिंदे गटात उडी घेतली. त्यामुळे दापोलीत ठाकरे गटाचा बुरुज ढासळला. हा बुरुज नव्याने बांधण्यासाठी संजय कदम यांना शिवसेनेत घेऊन पक्ष मजबूत करण्याची ठाकरेंची रणनीति असतानाच कदम यांना एसीबीची नोटीस आली आहे.

२०१४ ते २०१९ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत असताना संजय कदम यांनी बेकायदेशीरपणे इमारती व क्रशर उभारल्याची तक्रार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच इमारत बांधताना विहीर बुजवल्याची तक्रार आहे. त्यामुळे कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT