कोकण

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरीची शिक्षा

अविनाश सुतार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील एका गावात जवळच्या नात्यातीलच 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणार्‍या तरुणाला पोक्सो विशेष न्यायालयाने आज (दि.9) 20 वर्षे सक्तमजुरी आणि 43 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अनुराग मोतीराम बावकर (30, रा. राजापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना जुलै 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडली होती. याबाबत पीडितेच्या मावशीने तक्रार दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडितेच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती वडिलांच्या आईकडे म्हणजेच आजीकडे राहते. आजीबाहेर गेल्यावर अनुराग पीडितेवर वारंवार बळजबरी करत होता. याबाबत पीडितेने आपल्या आजीकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, पीडिता मुंबईला आपल्या मावशीकडे गेली होती. तिथून ती परत गावी परतण्यास तयार नव्हती. तेव्हा मावशीने तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने रडण्यास सुरुवात करुन सर्व हकिकत सांगितली. मावशीने याबाबत मुंबई येथील मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु घटना राजापूर येथे घडल्याने गुन्हा राजापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तत्पूर्वी मुंबईत पीडितेची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली होती.

गुन्हा राजापूर पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एल. मौले यांनी तपासाअंती अनुराग बावकर आणि गुन्ह्याचे कृत्य माहीत असूनही पोलिसांकडे तक्रार न दिल्यामुळे पीडितेच्या आजीविरोधात पोक्सो विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी 10 तर आरोपीच्या वतीने 3 साक्षीदार तपासण्यात आले.

दोन्ही पक्षांच्या युक्तीवादाअंती अनुरागचा गुन्हा सिद्ध झाल्याने विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला ए. राऊत यांनी भादंवि कलम 376 (2) (एन), (ए) (बी), 354, 354-ए, 377, 506 तसेच पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून 20 वर्ष सक्तमजुरी आणि 43 हजार 500 रुपये दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच पीडितेच्या आजीला हे कृत्य माहित असूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिला भादंवि कलम 202 अन्वये पोक्सो कायदा कलम 19 (1) सह 21 प्रमाणे दोषी ठरवून 1 हजार रुपये दंड तो न भरल्यास 10 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT