राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापुरातील आठवडा बाजारात अचानक गुलमोहराचे झाड कोसळून एकजण जागीच ठार झाला. तर तीन मच्छी विक्रेत्या महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज (दि. १३) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान गणेश विसर्जन घाटानजीक घडली. रामचंद्र बाबाजी शेळके (वय ४८, रा. बारसू ) असे मृताचे नाव आहे. ते रिक्षा चालवत होते. जखमींना पुढील उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले (Ratnagiri News) आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज आठवडी बाजार असल्याने झाडाखाली काही व्यापारी माल विक्रीसाठी बसले होते. त्यामध्ये मच्छी विक्रेत्यांचाही सामावेश होता. यावेळी अचानक झाड कोसळले. यात रामचंद्र बाबाजी शेळके, मच्छी विक्रेते मुमताज असिफ फणसोपकर, यास्मिन शौकत कोतवडेकर, सायका इरफान पावसकर जखमी झाले. त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. छातीला गंभीर दुखापत झाल्याने रामचंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. तर जखमी महिलांना पुढील उपचारासाठी रत्नागिरीला (Ratnagiri News) हलविण्यात आले होते.
या घटनेमुळे आठवडा बाजारात एकच धावपळ उडाली आणि पळापळ झाली. ग्राहक आणि व्यापारी भीतीने पळू लागले. जखमी झालेल्या सर्व महिला राजापूर शहरातील मच्छी विक्रेत्या आहेत. दर आठवड्याला बाजारात त्या मच्छी विक्रीसाठी येतात.
तहसीलदार शितल जाधव, नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, संदेश जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदिप मालपेकर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा