रत्नागिरी : नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी : नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  फुटबॉल खेळायला जातो, असे घरी सांगून प्रत्यक्षात मात्र, कुंभार्ली येथील नदीत चिंब भिजण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी दोघेजण बेपत्ता झाले होते. त्या दोघांचे मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत सापडले आहेत. तब्बल 24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे.रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे वाशिष्ठीच्या डोहात ही दुर्घटना घडली. सहा मुलांनी भिजल्यानंतर काही वेळात पाऊस आल्याने जवळच्या छपराखाली आसरा घेतला. मात्र, कादिर लसणे व आतिक बेबल हे दोघे याच ठिकाणी डोहात थांबले. मात्र, काही वेळाने वरच्या बाजूला जोरात पाऊस झाल्याने मोठे पाणी आले. यावेळी हे दोघे पाण्यात बुडाले.

वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते.
या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा पाऊस व अंधारामुळे शोधकार्य राबविणे शक्य झाले नाही. सकाळच्या वेळी महाड येथून प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू
करण्यात आले. यानंतर जयगड येथून कोस्टगार्डची टीमही दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे दाखल झाली आणि त्यांनीही ऑक्सीजन व कॅमेरे लावून डोहात उतरून शोधकार्य सुरू केले. मात्र, उशिरापर्यंत डोहामध्ये मृतदेह सापडत नव्हते. या टीमने खूप प्रयत्न केले. घळीमध्ये बांबू टाकून देखील पाहण्यात आले. मात्र, मृतदेह सापडले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा नदीपात्रालगत शोध मोहीम राबविण्यात आली.

सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आढळला. त्यानंतर दुसर्‍याचा शोध सुरू झाला आणि 5:30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील नदीतच पात्राच्या किनार्‍यावर दुसर्‍या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर हे शोधकार्य थांबले. दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

नॅशनल इंग्लिश स्कूलमधील दोघे विद्यार्थी..

शाळेला सुट्टी असल्याने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिकणारे इयत्ता दहावीतील आठ विद्यार्थी नदीत चिंब भिजण्यासाठी गेले होते. मात्र, घरामध्ये त्यांनी आपण फूटबॉल खेळायला जातो असे सांगितले होते. यामध्ये इब्राहिम काजोरकर (गोवळकोट), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट), फरहान हिदायत पिलपिले (खाटीक आळी चिपळूण), अली नियाज सनगे (रा. बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा. कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडीनाका चिपळूण), आतीक इरफान बेबल (रा. बेबल मोहल्ला, अब्दुल कादीर नौशाद लसणे (रा. जिव्हाळा सुपर बाझार) हे विद्यार्थी भिजण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र, त्यातील दोघेजण बुडाल्याने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

येथील चिपळुण तालुका मुस्लीम संघटनेचे अध्यक्ष नाझीम अफवारे, शाहनवाज शाह तसेच शिरगाव व चिपळूण पोलिस यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले. सोमवारी (दि.10) सकाळी जेसीबी पाठवून डोहाकडे येणारे नदीचे पाणी तीन बांध घालून वळविण्यात आले. तसेच डोहामध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रवाह निर्माण करण्यात आला. त्याआधी महाड येथील रेस्क्यू टीम, काही स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाताला काही लागले नाही. जयगड येथील कोस्टगार्डच्या टीमनेही प्रयत्न केला. मात्र, सायंकाळच्या सुमारास शिरगाव येथील नदीपात्रात कादिर लसणे व आतिक बेबल या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.

घटनास्थळाला आ. भास्कर जाधव यांनी दुपारी भेट दिली व शोधकार्याबाबत माहिती जाणून घेतली व रेस्क्यू टीमला मार्गदर्शन देखील केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, सुधीर शिंदे, फैसल कास्कर, बाळा आंबुर्ले, गणेश कोलगे, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटनास्थळी शोधकार्य बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांचा बंदोबस्त असूनही लोक दाद देत नव्हते.

सत्तर वर्षीय वृद्धाची शोधकार्यासाठी उडी…

कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहत असतात. मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी एका सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार न करता या डोहात उडी घेतली. त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले. यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news