Konkan Shimga Festival 2026: आमचे दाराशी हाय शिमगा..! Pudhari
कोकण

Konkan Shimga Festival 2026: आमचे दाराशी हाय शिमगा..!

कोकणात आजपासून रंगणार शिमगोत्सव; कोकणवासीयांची लगबग.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणच्या मातीतील संस्कृतीचा आरसा आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला पारंपारिक शिमगोत्सव रविवारी फाल्गुन पंचमीपासून (फाक पंचमी) गावोगावी मोठ्या थाटात सुरू होणार आहे. शिमग्याच्या निमित्ताने मुंबई-पुण्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी दाखल होत आहेत. त्यामुळे कोकणातील वाड्या-वस्त्या गजबजू लागणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून लगबग पहायला मिळाली.

कोकणातील शिमगा म्हणजे केवळ सण नव्हे, तर तो लोककला आणि श्रद्धेचा मिलाफ आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले संकासूर सध्या गावोगावी घरोघरी जाऊन आपल्या नृत्याने ग्रामस्थांचे मनोरंजन करत आहेत. ढोल-ताशांच्या आणि झांज-मंजिऱ्यांच्या ठेक्यावर ग्रामीण भागात खेळे रंगले असून, नमन आणि जाखडी नृत्याचे सूर आसमंतात घुमत आहेत.

रविवारपासून सुरू होणाऱ्या या शिमगोत्सवात प्रथम शेवर, आंबा, माड, चिवा आदी तोडून त्याची पुजा केली जाते. दररोज रात्री होम पेटवला जातो. त्यानंतर तेरसे व पौर्णिमेचे असे दोन शिमगे असतात. यावर्षी हे मुख्य सण 1 मार्च व 2 मार्च रोजी होणार आहेत. या दिवशी ग्रामदैवताचा पालखी सोहळा. फाक पंचमीला मांड फुकल्यानंतर, ग्रामदैवताची पालखी सजवून वाजत-गाजत घराघरात नेली जाते.

खांद्यावर पालखी घेऊन ग्रामस्थ ज्या उत्साहात नाचतात, ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. अनेक गावांच्या सीमांवर दोन देवांच्या पालख्यांची भेट घडवून आणली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत आहेत. काही गावांमध्ये 5 दिवस, तर काही ठिकाणी हा उत्सव 15 दिवसांपर्यंत चालतो. किंवा महिनाभरसुद्धा उत्सव सुरू असतो. यावर्षी प्रशासनाने उत्सवादरम्यान शांतता राखण्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले असून, गावोगावच्या मंडळांनी पारंपारिक प्रथा जोपासण्यावर भर दिला आहे.

कोकण रेल्वेच्या होळी विशेष गाड्या

होळीसाठी कोकण रेल्वे आणि खासगी बसेस पूर्णपणे फुल्ल झाल्या आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असलेले कोकणी बांधव या दिवसात आपल्या कुलदैवताच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जून गावी येतात. यामुळे बाजारपेठांमध्येही मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वेने तसेच एसटी महामंडळाने या वर्षी नियमित गाड्यांशिवाय विशेष गाड्याही सोडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT