Kalpana Kharat Bail  Pudhari
महाराष्ट्र

Kalpana Kharat: कल्पना खरातला दिलासा नाहीच! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, 'पतीच्या कृत्यांशी माझा संबंध नाही', कोर्टात दावा

Kalpana Kharat Bail Hearing: कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहाता न्यायालयात सुनावणी पार पडली. बचाव पक्षाने अशोक खरातच्या गुन्ह्यात सहभाग नसल्याचा दावा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

kalpana kharat anticipatory bail decision

प्रशांत शर्मा, शिर्डी, पुढारी न्यूज

अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राहाता येथील न्यायालयात बुधवारी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आता कल्पना खरात अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहाता न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. कल्पना खरातच्यावतीने प्रशांत गिरी तर सरकारी वकील पानगव्हाणे तसेच मुळ फिर्यादी गोंदकर याचे वकील शुभम गोंदकर यांनी युक्तिवाद केला.

'आर्थिक गैरव्यवहारांशी कल्पना खरातचा संबंध'

फिर्यादीच्या वकिलांनी दावा केली की, या संपूर्ण व्यवहारात अनेक आर्थिक देवाणघेवाणी झाल्या असून हा प्रकार मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असू शकतो. त्यांनी सांगितले की संबंधित एमओयूमध्ये कल्पना खरात यांना दोन टक्के व्याज देण्याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्यांना या व्यवहारातून आर्थिक फायदा होणार होता.

फिर्यादी पक्षाने असा मुद्दाही उपस्थित केला की, 57 जमिनींपैकी सुमारे 40 टक्के जमिनींवर कल्पना खरात यांचे नाव सातबाऱ्यावर आहे. त्यामुळे त्यांना व्यवहारांची पूर्ण माहिती होती, असा दावा करण्यात आला. तसेच त्या खरेदीखत प्रक्रियेला उपस्थित होत्या आणि नोंदणी कार्यालयात त्यांची उपस्थिती, फोटो आणि अंगठ्याचे ठसे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.

'माझ्याकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त नाहीत'

“माझ्या पतीने जर कोणताही गंभीर गुन्हा केला असेल, तर त्यामध्ये माझा कोणताही सहभाग नाही. माझ्याकडून पोलिसांना जप्त करण्यासारखा कोणताही महत्त्वाचा कागद किंवा पुरावा नाही", याकडेही बचाव पक्षाने न्यायालयाने लक्ष वेधले.

'कल्पना खरातच्या खात्यातून सात कोटींचे व्यवहार'

तपास अधिकारी निवात जाधव यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की कल्पना खरात यांच्या खात्यात तब्बल सात कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्या कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नसताना एवढी मोठी रक्कम खात्यात कशी आली, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारी पक्षाने आणखी एक मुद्दा मांडताना सांगितले की, पावर ऑफ अटर्नीमध्ये फक्त खरेदीचा अधिकार देण्यात आला होता. मात्र दस्त आणि पावर ऑफ अटर्नी एकाच दिवशी तयार करूनही खरेदीखत दोन दिवसांनी का करण्यात आले, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला.

'मी कुठेही पळून जाणार नाही'

कल्पना खरातच्या वतीने कोर्टात युक्तिवाद करताना मुलांचा उल्लेख करण्यात आला. ‘माझ्या पतीने गंभीर गुन्हे केले आहेत. सध्या मीडिया ट्रायल सुरू असून कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्याचा डाव आहे', असा दावा कल्पनाने कोर्टात केला. ‘माझा मुलगा18 वर्षांचा आहे. मला एक मुलगी आहे. माझे पती तुरुंगात आहे. ते बाहेर येतील की नाही मला माहीत नाही. आता कुटुंबाची काळजी मलाच घ्यायची आहे. त्यामुळे मला अटकपूर्व जामीन द्यावा. मी रोज हजेरीसाठी येण्यास तयार असून मी कुठेही पळून जाणार नाही', असं कल्पनाच्यावतीने वकिलांनी कोर्टात सांगितले.

'जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातचा संबंध नाही'

सुनावणीदरम्यान कल्पना खरातच्या वतीने वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, संबंधित जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातचा थेट सहभाग नव्हता. कल्पना चर्चेच्या प्रक्रियेतही सहभागी नव्हत्या, तसेच त्यांनी कोणाकडूनही व्याजाची रक्कम मागितलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की, कल्पना खरात यांनी काही आर्थिक व्यवहार (पैसे ट्रान्सफर) केले असले तरी ते त्यांच्या पतीच्या सांगण्यावरून केले होते. त्या व्यवहारामागील उद्देश किंवा स्वरूप त्यांना माहिती नव्हते, असेही बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास निर्णय दिला. कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने कल्पना खरातला लवकरच अटक होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT