

नाशिक : तंत्र-मंत्र, अघोरी पूजा आणि समस्यांचे निवारण करण्याचे आमिष दाखवत लोकांची फसवणूक करणारा तसेच अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणार्या भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधी रुपयांच्या साम्राज्यावर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा घावा घातला आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे त्याच्या आर्थिक व्यवहारांमधील धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
ईडीने खरातच्या विविध मालमत्तांची सखोल छाननी सुरू केली असून, संशयास्पद व्यवहारांच्या आधारे त्याच्या संपत्तीवर तात्पुरती टाच येण्याची शक्यता आहे. बोगस गुंतवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे त्याच्या अनेक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, काही बँक खाती सील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बनावट 32 बँक खात्यांमधून 57.90 लाखांची फसवणूक
सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली आहे. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे.
खरातने जमवलेली संपत्ती
पाथर्डीत 150 कोटीची 30 एकर जमीन
सिन्नरमध्ये 1कोटोची 45 एकर जमीन
गौळाणात 30 कोटीहून आधिक जमीन
गौळणेत शेत, मोक्याच्या जागी 15 भूखंड
मिरगावात 10 कोटी किंमतीचे फार्महाऊस
अहिल्यानगर 5 एकर कोट्यवधीचा भूखंड
ओझर विमानतळानजीक 5 कोटोची जमीन
जानोरी दहावा मैल भागात मोक्याच्या जागा
नाशिकमध्ये 1 कोटीचे कार्यालय
कर्मयोगी नगरमध्ये 5 कोटीचा बंगला
शिर्डीत 30 कोटीहून अधिक 30 गुंठे
निघोज येथे 4 एकर कोट्यावधीची जागा
शिर्डीत 70 कोटींहून अधिक जमीन प्लॅट
खरातचे ठाणे कनेक्शन
दरम्यान, अशोक खरातचे ठाणे कनेक्शन समोर आले आहे. ठाण्यातील निवृत्त सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कार्यालयातील महिला क्लर्कवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहेरवर आहे. इतकेच नव्हे तर व्हिडीओ व्हायरल करून वारंवार अत्याचार देखील त्याने केल्याचा आरोप आहे.