Gunaratna Sadavarte Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला त्यांनी ‘सीजनचा शो’ संबोधत, या आंदोलनामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘प्रोड्युसर’, मंत्री उदय सामंत ‘डायरेक्टर’ आणि मनोज जरांगे ‘अभिनेता’ असल्याची उपरोधिक टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी “कास्ट पॉलिटिक्स आणि पोल्युटेड पॉलिटिक्स” असा उल्लेख करत जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला.
सदावर्ते म्हणाले, “दूरचित्रवाणीवरील मालिकांप्रमाणे जरांगे नावाचा सीजन दरवर्षी येतो. या सीजनचे प्रोड्युसर एकनाथ शिंदे, डायरेक्टर उदय सामंत आणि कलाकार मनोज जरांगे व त्यांचा कंपू आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्वीच्या तुलनेत प्रतिसाद कमी असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला. अंतरवाली सराटीतील परिस्थिती आणि माध्यमांमधून दाखवण्यात येणारे चित्र यामध्ये फरक असल्याचे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांनी महिला अधिकाऱ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्यांवरही सदावर्ते यांनी तीव्र आक्षेप घेतला. महिला अधिकारी, महिला संघटना आणि संबंधित संघटनांनी या वक्तव्याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या कथित वक्तव्यांच्या आणि वर्तनाच्या परिणामांची चिंता करायला हवी,” अशी टीका सदावर्ते यांनी केली.
आंदोलनामुळे रस्ते बंद होणे, टायर जाळणे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याच्या घटनांवरही सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. आंदोलनाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जरांगे यांची प्रकृती खरोखरच खालावली असेल, तर प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्यावर उपचार करण्याची भूमिका घ्यावी, असेही सदावर्ते म्हणाले. ‘राईट टू लाईफ’ आहे; ‘राईट टू डाय’ नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांवरही सदावर्ते यांनी प्रश्न उपस्थित केले. जात प्रमाणपत्र आणि त्याची वैधता याबाबतची प्रक्रिया कायद्यानुसारच झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
बोगस किंवा अवैध जात प्रमाणपत्र आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करताना त्यांनी करदात्यांच्या पैशांचा वापर नियमबाह्य पद्धतीने होता कामा नये, असेही म्हटले.
जात पडताळणी समितीच्या कामकाजावर भाष्य करत सदावर्ते यांनी ही प्रक्रिया संविधानिक चौकटीत असल्याचे सांगितले. जात प्रमाणपत्राच्या वैधतेचा निर्णय संबंधित कायदेशीर प्रक्रियेतूनच झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी त्यांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली.
छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांना न बोलावल्याचा मुद्दाही सदावर्ते यांनी उपस्थित केला. “शिरसाट यांना केवळ त्यांच्या जातीच्या पार्श्वभूमीमुळे दूर ठेवण्यात आले का?” असा सवाल त्यांनी केला.
अशा प्रकारची वागणूक असेल तर ती गंभीर बाब असल्याचे सांगत सदावर्ते यांनी सरकारकडून याचे स्पष्टीकरण मागितले.
या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनसेवरही टीका केली. भाषिक वाद आणि सामाजिक संघर्षाला खतपाणी घालणाऱ्या राजकारणावर त्यांनी आक्षेप घेतला. अशा प्रकारच्या राजकारणामुळे समाजात संघर्ष वाढू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सदावर्ते यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना आपला विरोध संपूर्ण मराठा समाजाला नसून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीला असल्याचे सांगितले. ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर वंचित घटकांच्या संविधानिक मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनांना आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आंदोलकांमध्ये पुढील काळात काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.