

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जून ते सप्टेंबरदरम्यान कोणतीही झोपडपट्टी हटवू नये, असे स्पष्ट निर्देश असताना एमआयडीसीने अंबड येथील शांतीनगर झोपडपट्टी हटवून लोकांना बेघर केले आहे. अशी बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तानी कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा बेघर झालेल्यांनी पोलिसांत तक्रारी दाखल करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, असा सल्ला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
यावेळी आमरण उपोषण सोडण्यात आले, मात्र बिन्हाड आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शांतीनगर येथील अतिक्रमित झोपडपट्टी एमआयडीसीने हटविल्याच्या निषेधार्थ बेघर झालेल्या रहिवाशांनी उद्योग भवन येथील एमआयडीसी कार्यालयाबाहेर ८ जूनपासून बि-हाड आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे उद्योग भवन परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आंदोलकांच्या मते, २०११ पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचे राज्य शासनाचे धोरण असताना, शांतीनगरमधील घरे कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटेच्या सुमारास पाडण्यात आली. घरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर अनेक कुटुंबांना उघड्यावर आणून त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील हे मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ६ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांकडून सर्व माहिती घेऊन मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली. सदरची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून, अशी कारवाई करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारवाई करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जर गुन्हे दाखल केले नसतील, तर बेघरांनी गुन्हे दाखल करतील, असा इशारा अॅड. सदावर्तेनी दिला. यावेळी अॅड. सदावर्ते यांनी आमरण उपोषणास बसलेल्या दोघांना लिंबू-पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडले. मात्र, बिन्हाड आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
शिवसेनेला केले टार्गेट
अॅड. सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.