आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आणि पालिका प्रशासनाने दुबार मतदारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत दोन ठिकाणी नोंदलेली आहेत, अशा दुबार मतदारांना यंदा मतदानाच्या वेळी दोन ओळखपत्रे सादर करणे बंधनकारक असणार आहे. यासोबतच, त्या मतदारांकडून एकाच मतदान केंद्रावर मतदान करणार असल्याचे हमीपत्र (अर्ज ‘ब’) देखील भरून घेतले जाणार आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी सर्वसाधारण मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ वैध ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, ज्या मतदारांच्या नावासमोर दोन स्टार () चिन्ह आहे**, म्हणजेच जे दुबार मतदार आहेत, त्यांना या १२ ओळखपत्रांपैकी कोणतीही दोन ओळखपत्रे दाखवावी लागणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत यंदा होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे १ कोटी ३ लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, यामध्ये सुमारे १ लाख ६८ हजार मतदार दुबार असल्याचे निरीक्षण पालिका प्रशासनाने नोंदवले आहे. ही संख्या लक्षात घेता, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त राहावी यासाठी प्रशासनाने ही कडक उपाययोजना राबवली आहे.
दुबार मतदारांची खात्री करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १ लाख २६ हजार ६१६ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन पडताळणी केली. या तपासणीदरम्यान, ४८ हजार ३२८ दुबार मतदारांनी ‘फॉर्म अ’ सादर केला, ज्यामध्ये त्यांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शवली. याच मतदारांकडून दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही, असे लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे.
तथापि, अजूनही सुमारे ७८ हजार दुबार मतदारांकडून हमीपत्र भरणे बाकी आहे. अशा मतदारांकडून हे हमीपत्र थेट मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी भरून घेतले जाणार आहे. त्यामुळे अशा मतदारांनी मतदानासाठी जाताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पालिका प्रशासनाने स्पष्ट आवाहन केले आहे की, ज्या मतदारांच्या नावासमोर दोन स्टार चिन्ह आहे, त्यांनी मतदानाच्या दिवशी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी दोन वैध ओळखपत्रे आणि आवश्यक माहिती सोबत बाळगावी. यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ होईल आणि वेळेची बचत होईल.
या निर्णयामुळे निवडणुकीत दुहेरी मतदानाचा धोका टाळता येणार असून, मतदार यादीतील पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे. तसेच, सर्व मतदारांनी निर्भयपणे आणि योग्य पद्धतीने मतदान करावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
पासपोर्ट
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
केंद्र/राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे फोटो ओळखपत्र
राष्ट्रीयकृत बँक किंवा टपाल खात्याचे फोटो पासबूक
दिव्यांग प्रमाणपत्र
मनरेगा जॉब कार्ड
निवृत्ती वेतनाशी संबंधित फोटो कागदपत्रे
संसद किंवा विधानमंडळ सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र
श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा कार्ड