Kunal Kamra Delhi Court Notice: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणाऱ्या एका व्हिडिओवरून कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. न्यायालयाने कामराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या एका नेत्याने कामराविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश (ASJ) वंदना यांनी 20 जानेवारी 2026 रोजी हा आदेश दिला. कोर्टाने नोटीस देण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च रोजी होणार आहे.
ही याचिका शिवसेनेचे दिल्ली प्रमुख संदीप चौधरी यांनी दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुणाल कामराने ‘नया भारत’ नावाचा एक उपहासात्मक (satirical) व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेंबाबत अपमानास्पद आणि द्वेष पसरवणारी भाषा वापरण्यात आली, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.
चौधरी यांनी विशेषतः काही शब्दांवर आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये 'गद्दार', 'दल बदलू', आणि 'फडणवीस की गोदी' अशा शब्दांचा उल्लेख आहे.
या प्रकरणात आधी न्यायिक दंडाधिकारी हिमांशु सेहलोथ यांनी चौधरींची मागणी फेटाळून लावली होती. हा आदेश 15 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आला होता.
सेहलोथ यांनी सांगितलं होतं की, कामराने जे काही म्हटलं ते व्यंग, राजकीय विडंबन आणि टीका या स्वरूपात आहे. शिवसेनेतील फुट आणि राजकीय उलथापालथ यावर भाष्य करण्यासाठी हे सादरीकरण करण्यात आलं असावं, असंही त्यांनी नमूद केलं.
त्यांनी असंही सांगितलं की, ही भाषा काही लोकांना अपमानकारक किंवा अतिरेकी वाटू शकतं, पण त्यातून थेट दखलपात्र (cognisable) गुन्हा सिद्ध होत नाही.
या सुनावणीदरम्यान मॅजिस्ट्रेटांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली होती. तसंच, सार्वजनिक पदावर असलेल्या नेत्यांनी टीका सहन करण्याची मानसिकता ठेवायला हवी, कारण ते “स्तुती करणाऱ्या समाजात नाही, तर स्वतंत्र नागरिकांच्या समाजात राज्य करतात.''