Amit Thackeray  Pudhari
महाराष्ट्र

Amit Thackeray: अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; मनसेचे 70 कार्यकर्तेही अडचणीत, नेमकं काय घडलं?

Amit Thackeray Shivaji Maharaj Statue Case: नेरुळ येथे परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे आणि मनसेच्या 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Shelke

Amit Thackeray Shivaji Maharaj Statue Case Nerul MNS News: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याचा तसेच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील नेरुळ परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या 70 मनसैनिकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा आहे.

राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ हा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर चार महिने उलटूनही अधिकृत अनावरण न झाल्यामुळे पुतळा कापडाने झाकूनच ठेवण्यात आला होता. कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांना ही बाब समजताच त्यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी भेट दिली.

पोलिसांची उपस्थिती असूनही कोणतीही शासकीय परवानगी न घेता त्यांनी थेट पुतळ्यावरील कापड काढून अनावरण केले. अनावरणावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये किरकोळ ढकलाढकली झाली, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अनावरण प्रसंगी बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले की, ''मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणासाठी वेळ नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे अखेर या पुतळयांचे अनावरण केले आहे. महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण केल्याने पहिला गुन्हा दाखल होणार असेल तर चालेल.''

नेरुळ पोलीसांनी या प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे, जिल्हाध्यक्ष गजानन काळे, सविनय म्हात्रे यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल केला. एसीपी मयुर भुजबळ, नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी लावण्यात आलेल्या कलमानुसार दोन वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

न्यायालयाच्या भूमिकेकडे आता मनसेचे लक्ष लागून आहे. यामुळे ऐन निवडणुकीत अनावरण प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या अनावरणांमुळे राजकीय श्रेयवादांची लढाई येत्या निवडणुकीमध्ये रंगणार आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर अमित ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिलं की, ''महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन!''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT