कोल्हापुरात महायुतीने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

काँग्रेस, उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Maharashatra Assembly Election | कोल्हापुरात महायुतीने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

करण शिंदे

सतीश सरीकर

कोल्हापुरात महायुतीने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आम्ही बंडखोरी केली नसती, तर काँग्रेसने शिवसेना विकली असती, असा घणाघात केला. राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी प्रसंगी जेलमध्ये जाऊ; पण योजना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर शरसंधान साधले. प्रचाराचा नारळ फोडताना महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर महाराष्ट्रद्रोही असल्याचा प्रहार केला. प्रचाराचे रणशिंग कोल्हापुरातून फुंकण्याची परंपरा आहे. 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता यावी, असे साकडे घातले. त्यानंतर भाजप, शिवसेना, अजित पवार गटाकडून एकत्रित महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

महायुती सरकारने आपल्या कालावधीत केलेली विकासकामे अन् प्रकल्पांचे रिपोर्ट कार्ड काढले आहे. रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी धाडस आणि हिंमत लागते, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महायुतीने महाराष्ट्रात सात लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणली. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीत आता राज्य एक नंबरवर आहे. महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकारच्या कालावधीतील विकासकामांचे मूल्यमापन करण्याचे आव्हानही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस महाविकास आघाडी महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप केला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेल्याचा खोटा प्रचार करत असल्याचे सांगितले. महायुतीने दहा कलमी वचननामा यावेळी जाहीर केला. त्यात राज्यातील सरसकट सर्वांना वीज बिलात 30 टक्के सवलत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये, 25 हजार महिलांना पोलिस दलात भरती करून घेणार, अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले.

मविआतील बंडाळीचा महायुती फायदा उठविणार?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण होते; मात्र ती सहानुभूती विधानसभेपर्यंत महाविकास आघाडीला टिकविता आली नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनाच कार्यकर्त्यांनी आव्हान दिले. राज्यभर ठिकठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. परिणामी, महाविकास आघाडीत बंडाळी माजली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांना विरोधकांशी लढण्यापेक्षा आघाडीतील नेत्यांशीच झुंझावे लागत असल्याचे वास्तव आहे. त्याचा फायदा महायुती उचलेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभाने मंगळवारचा दिवस गाजला. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराची सुरुवात करवीरनगरीतून करण्यात आली, तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने प्रचाराचा नारळ फोडला. दोघांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून प्रचाराचा धुरळा उडविला आहे. आता हा धुरळा संपूर्ण राज्यात उडणार आहे. महाराष्ट्रावर सत्ता मिळविण्यासाठी सुरू झालेल्या या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT