

बुलढाणा : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण ११५ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. बुलढाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद या पाच मतदारसंघात दुरंगी तर मेहकर व सिंदखेडराजा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे संजय गायकवाड व महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके या दोघांत अटीतटीची लढत संभवते. चिखली मतदारसंघात महायुतीच्या श्वेताताई महाले व महाविकास आघाडीचे राहूल बोंद्रे या दोन उमेदवारांत मुख्य लढत होईल. खामगाव मतदारसंघात महायुतीचे आकाश फुंडकर व महाविकास आघाडीचे दिलीप सानंदा या दोघांत चुरशीची लढत आहे.
जळगाव जामोद मतदारसंघात महायुतीचे डॉ. संजय कुटे व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.स्वातीताई वाकेकर यांच्यात दुरंगी लढत होत आहे. मलकापूर मतदारसंघात महायुतीचे चैनसुख संचेती व महाविकास आघाडीचे राजेश एकडे या दोघांत चुरशीची लढत होत आहे. अनूसूचित जातीसाठी आरक्षित मेहकर मतदारसंघात महायुती शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.संजय रायमूलकर, महाविकास आघाडीचे सिध्दार्थ खरात व वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवार ऋतुजा चव्हाण यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे आणि महायुतीचे डॉ.शशिकांत खेडेकर व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मनोज कायदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांत मैत्रीपूर्ण लढत होत आहे.