Ajit Pawar’s Political Legacy Pudhari
महाराष्ट्र

Ajit Pawar’s Political Legacy: 'दादा स्कूल ऑफ पॉलिटिक्स’, अजित पवारांनी घडवलेले दमदार नेते कोणते?

Ajit Pawar’s Political Legacy: महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे केवळ प्रभावी नेते नव्हते, तर नेतृत्व घडवणारे नेते होते. अनेक आमदार, मंत्री आणि संघटनात्मक नेत्यांना त्यांनी संधी देत पुढे आणले.

Rahul Shelke

Ajit Pawar as a Leader Who Built Leaders: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रातील एक ताकदवान नेता हरपला नाही, तर अनेक पिढ्यांना दिशा देणारा आणि नेतृत्व घडवणारा मार्गदर्शकही काळाच्या पडद्याआड गेला आहे.

अजित पवार म्हणजे वेगवान निर्णय, रोखठोक बोलणं, प्रशासनावर पकड, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि कामाचा प्रचंड झपाटा. मात्र या ओळखींपलीकडे त्यांची एक वेगळी छाप होती ती म्हणजे नव्या नेत्यांना संधी देणं, त्यांना घडवणं आणि राजकीय लढाईसाठी तयार करणं. महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे अनेक नेते दिसतात, त्यांच्या मागे अजित पवारांचे पाठबळ होते.

इंदापुरात दत्तात्रय भरणे यांच्यावर त्यांचा विश्वास होता. पहिल्या पराभवानंतरही त्यांनी साथ सोडली नाही; जिल्हा परिषद, बँकांचं नेतृत्व, त्यानंतर विधानसभेतील विजय, या सगळ्या टप्प्यांत दादांची साथ निर्णायक ठरली.

मराठवाड्यात राजेश विटेकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेपर्यंत नेणं, हा दादांच्या संघटन कौशल्याचा भाग होता. पक्षातील फाटाफुटीच्या काळातही संघटनेची पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मावळमधील आमदार सुनिल शेळके हे त्याचेच एक उदाहरण. 2019च्या निवडणुकीनंतर त्यांनी अजित पवारांवर विश्वास ठेवला आणि दादांनीही त्यांना राजकीय बळ दिलं. पक्षीय समीकरणं बदलत असतानाही निष्ठेला महत्त्व देणाऱ्यांच्या सोबत दादा होते.

पवार कुटुंबातीलच रोहित पवार यांचाही प्रवास वेगळा आहे. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक समीकरणं बदलली, तरी रोहित पवारांना राजकारणात आणण्यापासून आमदार होईपर्यंत अजित पवारांची भूमिका महत्त्वाची राहिली.

नगर शहरातील संग्राम जगताप यांच्याही कारकीर्दीत दादांचा मोठा वाटा आहे. शहराध्यक्षपदापासून आमदारकीपर्यंत टप्प्याटप्प्याने संधी देत नेतृत्व उभं करणं, ही अजित पवारांची खासियत होती.

पुण्यातील सुनिल टिंगरे हे दादांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक नाव. वडगाव शेरीसारख्या लढतीच्या मतदारसंघात थेट बलाढ्य विरोधकासमोर उभं करणं आणि निवडणूक जिंकवणं, हे दादांच्या राजकीय धैर्याचं उदाहरण होतं. आरोप-प्रत्यारोपांच्या काळातही आपल्या माणसामागे ते ठामपणे उभे राहिले.

ग्रामीण पट्ट्यात शंकर मांडेकर यांना भोरमधून उभं करणं, दिग्गजांना पराभूत करणं, यामागेही अजित पवारांचा राजकीय अनुभव होता. योग्य जागी योग्य उमेदवार हा दादांचा फॉर्म्युला इथे यशस्वी ठरला.

नगर जिल्ह्यातील निलेश लंके यांना आमदार करणं, हा दादांचा आणखी एक धाडसी निर्णय होता. नंतर राजकीय वाटा वेगळ्या झाल्या, तरी दादांबद्दलचा आदर कायम राहिला, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण होतं.

आज अजित दादा आपल्यात नाहीत. सत्ता येते-जाते; मात्र नेतृत्व घडवणारा वारसा हा फार थोड्यांच्या वाट्याला येतो. अजित पवार त्या मोजक्यांपैकी एक होते, याची जाणीव त्यांच्या पश्चात अधिक ठळकपणे जाणवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT