

परळी वैजनाथ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची वार्ता धडकताच परळी शहरासह ग्रामीण भागात भीषण शांतता पसरली. गेल्या १५ वर्षांपासून परळीच्या विकासात आणि राजकारणात अविभाज्य घटक राहिलेल्या अजितदादांच्या जाण्याने परळी पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या अनुषंगाने परळीची बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती चौकात एकत्रित येत "अजितlदादा पवार अमर रहे" च्या घोषणा देत भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली.
बाजारपेठा आणि शाळा बंद; शहर झाले शोकाकुल
अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच परळीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात जमलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी होते. भाजप, राष्ट्रवादी आणि इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला सारून आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
भेटीची संधी कायमची हुकली
माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी अत्यंत जड अंतःकरणाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. "आम्ही आणि आमदार धनंजय मुंडे साहेब लवकरच विकासकामांच्या शुभारंभासाठी दादांची वेळ घेणार होतो. नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी बारामतीला जाणार होते; मात्र नियतीने ती संधीच हिरावून घेतली," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
"ये बजरंगा बस" म्हणणारे दादा हरवले
केज :- ज्या वेळी मी अजितदादा पवार यांना भेटत असे त्यावेळी ये बजरंगा बस असे म्हणणारे दादा आज आपल्या नाहीत. तसेच ते येडेश्वरी कारखान्याचा अभिमानाने उल्लेख करीत असत अशी प्रतिक्रिया खा. बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधना निमित्त त्यांच्या फेसबुक पोस्टमधून केली आहे.
कामाच्या बाबतीत कठोर असलेले अजित दादा पवार - खा. रजनीताई पाटील
- उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली मृत्यू बाबत राज्य सभेच्या खा. रजनीताई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस अतिशय दुःखद बातमीने सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव असणारे, प्रशासनावर भक्कम पकड असणारे नेते आणि आपल्या स्वभावाने रोख ठोक असणारे मात्र तेवढ्याच ताकदीने काम करणारा नेता म्हणून अजित दादांची ओळख होती मात्र आज दादांच्या अकाली जाण्याने आम्हा पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आमचे आणि पवार परिवाराचे कौटुंबिक स्नेह होते ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
अजित दादा यांच्या जाण्याने अपरिमित हानी --- रमेशराव आडसकर
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाची माहिती होताच केज येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने व व्यवहार बंद करून अजित दादा पवार यांना श्रद्धांजली व्यक्त केली. तसेच केज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्या मध्ये राष्ट्रवादीचे नेते रमेशराव आडसकर, युवानेते ऋषिकेश आडसकर, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, गटनेते हरून इनामदार, माजी जिल्हा.परिषद सदस्य किसनदादा कदम, नगरसेवक अझर इनामदार, सुनील हिरवे, सरपंच कैलास जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिलेला शब्द पाळणारे आणि प्रशासनावर वचक असलेले दादा हरपले : माजी आ. प्रा. सौ. संगीताताई ठोंबरे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली मृत्यू बाबत हळहळ व्यक्त करताना केज विधासभा मतदार संघाच्या माजी आमदार आणि शिंदे सेनेच्या उपनेत्या प्रा. सौ संगीताताई ठोंबरे यांनी म्हटले आहे की, अजितदादा हे दिलेला शब्द पाळणारे, हजरजबाबी आणि प्रशासनावर वचक असलेले नेतृत्व आज हरपले आहे. दादा, तुमच्या जाण्यान निर्माण झालेली पोकळी शब्दांत मांडता येणार नाही ती कधीही न भरून निघणारी आहे.
सौ. सिताताई बनसोड, (नगराध्यक्षा, केज) :- अजितदादा पवार यांच्यासारख्या ढाण्या वाघावर काळाने झडप घातली आहे. कामाला महत्व देणारे आणि स्पष्ट व वक्तशीरपणा या बाबत दादांची ख्याती होती. त्यांना केज नगर पंचायतीच्या आणि नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
हारून इनामदार, (गटनेते नगरपंचायत केज) :- अजित दादा यांच्यावर काळाने झडप घातली आणि रांगडा आणि जमिनीशी नाळ जोडलेला हजारो कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या कारखान्याचा मालक आज आपल्यातून निघून गेला आहे. अजित पवार यांना केज वासीय, नगरपंचाय आणि इनामदार परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
माजलगाव शंभर टक्के बंद; सर्वपक्षीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
माजलगाव – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. या घटनेचे तीव्र पडसाद माजलगाव शहरातही उमटले. या दुःखद घटनेच्या निषेधार्थ आणि शोक व्यक्त करण्यासाठी माजलगाव शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले.