Ajit Pawar Death Controversy: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात आहे का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली होती. कदम यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीमधील दोन नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या वादाकडे लागले आहे.
रामदास कदम यांच्या आरोपांवर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी कदम यांच्या विधानाचा निषेध केला. तसेच, त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “रामदास कदम यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. रामदास कदमांची मानसिक स्थिती पाहता, ठाण्यापेक्षा आग्र्याला मानसोपचारतज्ज्ञ अधिक चांगले आहेत. त्यांनी तेथे उपचार सुरू करावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे.
अंतुले साहेबांनी माझ्यावर पुत्राप्रमाणे प्रेम केलं, कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली. मी त्यांचा आदर करतो आणि नेहमीच त्यांचा उल्लेख करतो. मी काही त्यांचा पीए नव्हतो. अंतुले साहेबांविरोधात कदम यांनी किती गरळ ओकली आहे, हे सर्वांनीच पाहिले आहे.
त्यामुळे अंतुले साहेबांवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार कदमांना नाही. मी त्यांना लवकरच कायदेशीर नोटीस देणार आहे. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंचे नेते अनिल परब यांनी त्यांच्यावर जे आरोप केले आहेत, त्याचा त्यांनी पहिला खुलासा करावा आणि स्वतःची प्रतिमा नेमकी काय आहे ते सांगावे.”
तटकरे यांनी या प्रतिक्रियेत रामदास कदम यांच्या जुन्या विधानांचाही उल्लेख केला. तसेच, दिवंगत माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कदम यांनी केलेले आरोप मान्य नसल्याचे सांगत त्यांनी कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचा इशारा दिला.
या प्रकरणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी तटकरे यांना विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी यापूर्वी कधीही कोणासमोर कैफियत मांडलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या सर्वांना माझी राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे ज्ञात आहे. त्यामुळे मी कोणाकडेही तक्रार केलेली नाही.”
अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून सुरू झालेला हा वाद आता महायुतीतील नेत्यांमधील संघर्षाचे कारण ठरताना दिसत आहे. एका बाजूला रामदास कदम यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे, तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध करत कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.