अहमदनगर

होय आंबाच ! पण दीड किलोचा अन् पाऊण फुटाचा! वाचा सविस्तर

अमृता चौगुले

लोणी : पुढारी वृत्तसेवा

दीड, दोन किलोचा आंबा… अर्धा ते पाऊण फुट लांबीचा आंबा.. असे आंब्याचे तब्बल 110 विविध वाण बाभळेश्वरच्या आंबा महोत्सवात पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. दरम्यान, आंब्याचे हे विविध वाण या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. हा आंबा महोत्सव व कृषी प्रदर्शन व आंबा उत्पादकांना शाश्वत आंबा शेतीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे.

बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारपासून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा, खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा महोत्सव व कृषी प्रदर्शन सुरू आहे. स्थानिक वाणासह अनेक शेतकर्‍यांनी आंबा पिकामध्ये संशोधन करत वेगवेगळ्या वाणाची निर्मिती केली आहे.

यामध्ये अस्तगाव (ता. राहाता) श्रीकांत टिळेकर यांनी 3 वाणांवर संशोधन करत बाराही महिने उपलब्ध होणारा आंबा, एलीफंटा क्वीन अर्धा ते पाऊण फुटांचा श्रीगणेश हे वाण तयार केले आहेत. आंबा फळ प्रदर्शनातून प्रत्येक वाण त्यांची वैशिष्टये यांची माहीती शेतकर्‍यांना मिळते. आंबा पिकापासून अनेक प्रकारे प्रक्रिया करता येते. भविष्यात प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी अनेक प्रक्रिया पदार्थ या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

कृषी प्रदर्शनामध्ये विविध रोपे, रासायनिक खते, बि-बियाणे, औजारे, सिंचन साहित्य, सेंद्रीय खते, छोटी औजारे, म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर पणन मंडळ, विखे पा. कारखान्याचे तेजस सेंद्रीय खत, प्रवरा बँक, विमा, प्रवरा शिक्षण संस्थेची शैक्षणिक माहिती, जनसेवा फौडेशन अंतर्गत खाद्य पदार्थांसह विविध शेतकर्‍यांनी शेतकरी ते थेट ग्राहक अंतर्गत आंबा विक्रीचे स्टॉल्स लावले आहेत. आंबा महोत्सव व कृषी प्रदर्शन सोमवारपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. दरम्यान, आज शनिवारी या महोत्सावात खरीप उत्पादन तंत्रज्ञान परिसंवादामध्ये मका, कपाशी या विषयांवर परिसंवाद होणार आहे.

110 वाणांनी वेधले लक्ष..!
या निमित्ताने आंबा फळ प्रदर्शनामध्ये केशर, पायरी, तोतापुरी, हापुस, लंगडा, राजापुरी वनराज, मल्लीका, रत्ना, दशेहरी, वनराज मा एलीफंटा क्वीन, बारमही शेंद्री, श्रीगणेश असे जवळपास 110 वाण शेतकर्‍यांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.

आ. राधाकृष्ण विखे पा. कृषी मंत्री असताना शेतकरी ते थेट ग्राहक विक्री ही संकल्पना त्यांनी सुरू केली. या महोत्सवामध्ये शेतकर्‍यांना स्टॉल्स उपलब्ध केले आहेत. 5 स्टॉल्समधून शेतकर्‍यांनी तब्बल 1 लाख रूपयांची आंबा विक्री केली आहे.
डॉ. संभाजी नालकर, प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT