पुढील पाच वर्षांत आणखी उष्णतेच्या लाटा येणार

पुढील पाच वर्षांत आणखी उष्णतेच्या लाटा येणार
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दहा वर्षांत हवामानात झालेल्या तीव्र बदलामुळे उष्णता वाढू लागली आहे. 2021 हे सर्वाधिक उष्णतेचे वर्ष म्हणून ओळखले गेले. 2022 ची सुरुवातही उष्णतेच्या लाटांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील पाच वर्षे उष्णतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होतील, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला असून, यामुळे जागतिक हवामानावरही मोठे परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

बदलत्या हवामानामुळे हरित वायूचे प्रमाण कमी होणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणे तसेच पाण्याचे आम्लीकरण वाढणे असे परिणाम दिसून येत आहेत, असे 2021 च्या जागतिक हवामान अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जमीन आणि समुद्र या दोन्ही पातळीवर मोठे परिणाम जाणवत आहेत. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही उष्णतेने उच्चांक केल्याचे पाहिले गेले आहे. 46 ते 48 अंशापर्यंत उष्णतेचे परिणाम जाणवले होते.

2017 मध्ये रायगड जिल्ह्यातील भिरा या भागामध्ये सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर दुसर्‍या बाजूला 2022 मध्ये विदर्भातील वर्ध्याचे तापमान 46 अंश सेल्सिअसवर गेले होते. जळगावमध्येही तापमानात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मानवी हस्तक्षेपामुळे जमीन समुद्र या दोन्ही स्तरावर मोठे परिणाम जाणवत आहेत. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय घटकांमध्ये दीर्घकालीन परिणामांमुळे पुढील धोक्याचा इशारा जागतिक हवामान अहवालामध्ये देण्यात आला आहे. गेली दहा वर्षे विक्रमी उष्णतेची होती. 2021 हे वर्ष नीना सक्रिय असल्याने उष्णतेचा नवा उच्चांक नोंदविणारे ठरले. 1.11 अंश सेल्सिअस एवढी उष्णता वाढल्याची नोंद झाली आहे.

हरितगृह वायूंचे प्रमाण 2020मध्ये सर्वाधिक होते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे औद्योगिक क्रांतीपूर्व काळापेक्षा 149 टक्क्यांनी अधिक होते. काही ठरावीक ठिकाणांच्या उपलब्ध माहितीनुसार हे प्रमाण 2021 आणि 2022च्या सुरुवातीच्या काळात सातत्याने वाढलेले दिसले. हवाईमधील मौनालोआ इथे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण एप्रिल 2020 मध्ये 416.45 मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी (पीपीएम) असे होते, ते एप्रिल 2021 मध्ये 419.05 तर एप्रिल 2022 मध्ये 420.23 पीपीएम नोंदवले गेले. समुद्राची उष्णताही सर्वाधिक नोंदली गेली. समुद्राच्या वरच्या थरातील 200 मीटरपर्यंतचे पाणी 2021 मध्ये उष्ण होते. हे पाणी येत्या काळातही असेच उष्ण असेल, असा अंदाज आहे.
उष्णकटिबंधीय चक्रीवादळेही वाढण्याची शक्यता गेल्या दोन दशकांमध्ये समुद्रच्या पाण्याची उष्णता सातत्याने वाढत असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसत आहे.

समुद्रामध्ये मानवी कृत्यांमुळे निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साईडपैकी 23 टक्के कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. परिणामी समुद्राचे पाणी आम्लयुक्त होते. यामुळे सागरी जैवविविधतेला धोका निर्माण होता. समुद्राच्या पाण्याची पीएच पातळी यामुळे कमी होते. आयपीसीसीच्या अहवालानुसार समुद्राच्या पृष्ठभागावरील पीएच पातळी ही गेल्या 26 हजार वर्षांमधील सर्वांत खालावलेली होती. हा स्तर अधिक खाली घसरत असल्याचेही जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. बर्फ वितळण्याचा वेग वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून किनार्‍यांवरील नागरिकांसाठी हा मोठा धोका आहे. तसेच, यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळेही वाढण्याची शक्यता आहे.

  • गेल्या दोन वर्षांत 1.11 अंश सेल्सिअसने उष्णता वाढली
  •  जागतिक आरोग्य संघटनेचा 2021च्या अहवालातील नोंदी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news